डोंबिवली – डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक (डाॅ. घारडा सर्कल) येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी सोमवारी रात्री साडे आठ वाजता आले होते. या अनावरणाच्या कार्यक्रमात तीन भुरटे चोर शिवसैनिक म्हणून गळ्यात भगवे दुपट्टे घेऊन सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री व्यासपीठावरून उतरत असताना एका भुरट्याने चोराने एका शिवसैनिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. हा चोर ॲड. गणेश पाटील यांच्या सेल्फी काढतानाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. उपस्थित पोलिसांनी तात्काळ भुरट्या चोराला अटक केली. दोन भुरटे पळून गेले.
उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांनी भुरट्या चोरावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले. या चोराला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराज चौक (जुना घारडा सर्कल चौक) येथे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण डोंबिवली पालिकेने दीड कोटी खर्चाचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री साडे आठ वाजता डोंबिवलीत आले होते. हा कार्यक्रम रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरू होता. कार्यक्रमाला महिला पारंपारिक वेशभुषेत सोन्याच्या दागिन्यांनी मढून आल्या होत्या. अनेक शिवसैनिकांच्या गळ्यात सोनेरी साखळदंड, हातात सोनेरी कडे, कानात डूल होते.
कार्यक्रम स्थळी तुफान गर्दी, रेटारेटी होईल त्यावेळी सावज टिपून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जाऊ असा विचार करून तीन तरूण भुरटे चोर गळ्यात भगवे दुपट्टे घालून व्यासपीठाच्या भोवती हजर होते. व्यासपीठा भोवती पोलिसांचे कडे होते. रात्री साडे दहा वाजता कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावरून कार्यकर्त्यांच्या घोळक्यातील गर्दीतून उतरत होते.
यावेळी डोंबिवली महाराष्ट्रनगरमधील रहिवासी ॲड. गणेश पाटील व्यासपीठावर उभे राहून मोबाईलमधून उपमुख्यमंत्र्यासोबत सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असताना ॲड. पाटील यांना गळ्यात भगवा दुटप्पा असलेला एक इसम एका शिवसैनिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून ती भगव्या दुटप्प्यात लपवित असल्याचे दिसले. ॲड. पाटील यांनी तात्काळ त्या स्वयंंघोषित शिवसैनिकाला जाऊन तू आता काय केलेस. हातात काय आहे असे विचारताच तो गडबडला. ॲड. पाटील यांनी हा चोर असल्याचा ओरडा केला. त्यावेळी एका शिवसैनिकाने आपल्या गळ्यातील सोनसाखळी गायब असल्याचे सांगितले. बाजुच्या भुरट्याच्या हातात ती सोनसाखळी होती.
व्यासपीठावरील पोलिसांनी तात्काळ चोरट्याला ताब्यात घेतले. सेल्फीत चोरटा दिसला नसता तर आणखी दोन ते तीन जणांना चुना लावून पळ काढला असता, असे ॲड. गणेश पाटील यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.