लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पूर्व भागातील जुना आयरे रस्ता भागात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज दोन चोरांना रिक्षेतून येऊन शनिवारी रात्री लुटून नेला. महिलेने ओरडा करताच गस्तीवरील रामनगर पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करुन तात्काळ अटक केली.
सत्येंद्र जयस्वाल आणि लक्की चारी अशी चोरट्यांची नावे आहेत. सत्येंद्र दावडी गावात राहतो. चारी मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. डोंबिवलीतील जुना आयरे रस्ता भागात घरी जाण्यासाठी चित्रा नाडर या रिक्षेची वाट पाहत रात्री अकरा वाजता उभ्या होत्या. तेवढ्यात एक रिक्षा जवळ आली. रिक्षेत प्रवासी म्हणून बसलेल्या आरोपी सत्येंद्र आणि लक्की यांनी चित्रा यांना काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यावर थाप मारुन गळ्यातील सोनसाखळी हिसकावून रिक्षेसह पळ काढला.
आणखी वाचा-ठाण्यातील व्होल्टास करोना रुग्णालयातील उपकरणांचे स्थलांतरण
चित्रा यांनी रिक्षेचा पाठलाग करत चोर म्हणून ओरडा केला. तेवढ्यात गस्तीवरील पोलीस या भागातून जात होते. त्यांना चोर रिक्षेतून पळत असल्याचे लक्षात आले. पोलीस पाठलाग करत आहेत हे पाहिल्यावर चोरट्यांनी रिक्षा सोडून देऊन पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना डोंबिवली रेल्वे स्थानक भागातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून दोन लाख २५ हजाराचा ऐवज ताब्यात घेतला.