मॉडेल इंग्लिश स्कूल, डोंबिवली

नोकरी-धंद्याच्या निमित्ताने चाकरमानी वर्ग डोंबिवलीत स्थिरावला. विविध जाती-धर्माचे लोक मुंबई व उपनगरांतून येथे वास्तव्यास आले. शहराच्या विकासात शिक्षण सुविधा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे शिक्षणासाठी येथील मुलांना मुंबईला जावे लागू नये म्हणून काही व्यक्तींनी येथे शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. मराठी माध्यमाबरोबरच इतर भाषिक विद्यार्थ्यांनाही येथेच शिक्षण घेता यावे तेही इंग्रजी माध्यमातून यासाठी केरळीय समाजाने येथे मॉडेल इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेचे हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने शाळेच्या वाटचालीचा आढावा..

डोंबिवलीतील महाराष्ट्रीयांची बहुसंख्या असली तरी इतर भाषक लोकांची संख्याही लक्षणीय आहे. मराठीतून शिक्षण देणाऱ्या स.वा.जोशी शाळा, टिळकनगर विद्यालय या शाळा होत्या. त्या जोडीनेच इतर भाषक विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची आवश्यकता भासू लागली.  त्यातूनच केरळीय समाजाने १९६६ मध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू केले.   पी. गोपालकृष्ण, तंगप्पन नायर, ए.के.मेनन, के.पी.बालकृष्णन, एम.एन.के.मेनन, व्ही.एम.आर नायर, टी.पी.आर. मेनन, सी.पी.विजय गोपालन, के.एस.मेनन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. यंदा शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने शाळेने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती शिक्षिका इशा वेलदे यांनी दिली.

डोंबिवलीतील सारस्वत कॉलनीमधील छेडा सदनमध्ये प्रथम एका खोलीत बालवर्ग भरविण्यात आला. येथेच केरळीय समाजाचे कार्यालयही थाटले गेले. त्यानंतर डोंबिवली स्थानक परिसराजवळ बाजीप्रभू चौक येथे भाडेतत्त्वावर जागा घेऊन तेथे प्राथमिक शाळा भरविली जाऊ लागली. आजही येथे ही शाळा व संस्थेचे कार्यालय आहे. त्यानंतर एक दोन वर्षांतच डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी येथे स्वत:ची जागा घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळेस सुरुवात केली. त्यानंतर १९९५-९६ मध्ये पश्चिमेला विष्णूनगर तर २००५ मध्ये कुंभाखानपाडा येथे शाळेच्या शाखा उभारण्यात आल्या. यानुसार केरळीय समाजाच्या चार शाखांचा विस्तार डोंबिवलीत झाला.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता मुरलीधर यांच्या मतानुसार लहान रोपटय़ांना जसे खतपाणी घालून त्याचे मोठय़ा वृक्षात रूपांतर केले जाते. त्याचप्रमाणे या शाळेत विविध उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला जातो. जसे विज्ञान, कला प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, नाटय़, संगीत, नृत्य अशा स्पर्धाबरोबरच आजच्या स्पर्धात्मक युगात आपला विद्यार्थी यशस्वी व्हावा म्हणून येथे गणित, विज्ञान, संगणक, इंग्रजी अशा विषयांच्या स्पर्धात्मक परीक्षांचाही अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी वाचनालय, विज्ञान, संगणक, प्रयोगशाळा, स्मार्ट क्लास अशा सुविधाही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे शाळेने आजपर्यंत आपला शंभर टक्के निकाल राखून ठेवला आहे.

कालाय तस्मै नम: काळानुसार तर बदललेच पाहिजे. परंतु आपल्या संस्कृतीच्या खुणाही जपल्या पाहिजेत. त्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी रामायण, महाभारत यावर आधारित संस्कृत श्लोक, पठण स्पर्धा, लोकनृत्य, लोकसंगीत, भारतीय पारंपरिक वाद्य स्पर्धाही घेतल्या जातात. याला विद्यार्थी व पालक यांचाही भरभरून प्रतिसाद असतो. तसेच दसरा, दिवाळी, गणपती, ओणम, नाताळ असे सण साजरे करून भारतीयत्वाचे संस्कारही केले जातात.

विद्यार्थ्यांचा असा सर्वागीण विकास साधण्यासाठी गुणवत्ताधारक व सुसंस्कृत शिक्षकांची गरज असते. तसे उच्चशिक्षित व सुसंस्कृत शिक्षकही शाळेला लाभलेले आहेत. विशेष म्हणजे शाळेत स्त्री शिक्षकांची संख्या अधिक आहे. या कुटुंबात केवळ शिक्षक विद्यार्थीच नाही तर पालकांचाही क्रियाशील सहभाग असतो. शाळेला असे कुटुंबाचे स्वरूप प्राप्त होण्यामागे व्यवस्थापनाचाही मोठा वाटा आहे. व्यवस्थापनाच्या कार्यकारिणीची निवडणूक दर दोन वर्षांनी होते. या व्यवस्थापनाचे विशेष म्हणजे कोणतीही कार्यकारिणी आली तरी त्यांचा शालेय उपक्रमांत व शिक्षकांच्या अध्यापन कार्यात कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे अशा राजकारणविरहित व स्वतंत्र अशा पोषक वातावरणात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व संस्थाही मोठी होत गेली. या कार्यकारिणीत सध्या अध्यक्ष एम.रामन, उपाध्यक्ष दामोदरन, ओ.प्रदिप, डॅनिअल, शैक्षणिक कार्यवाह सुरेश कुमार व सांस्कृतिक कार्यवाह म्हणून सी.के.रमेश यांचा समावेश आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षांचा उद्घाटन सोहळा शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला म्हणजे जुलै महिन्यात डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात अत्यंत कल्पकतेने व सुंदरतेने पार पडला. महाराष्ट्राचे लेझीम तर केरळचे पारंपरिक संगीत, दोन्ही राज्यांच्या पारंपरिक रांगोळ्यांची सजावट व दिव्यांची रोषणाई होती. महाराष्ट्रीय व केरळी संस्कृतीच्या मिलाफाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले गेले.

गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा

सुवर्ण महोत्सवानिमित्त अलीकडेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. नेत्रचिकित्सक डॉ. तुषार छेडा, कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अनिल हेरुर, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. रोहन फलाडी, पद्मश्री हॉस्पिटलचे डॉ. अंबरिश नंदा, लक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ. पृथी, डॉ. मेघना महालपुरकर, डॉ. अनघा महालपुरकर तर कला क्षेत्रात प्रसिद्ध डॉ. नेहा राजपाल, डेझी शहा, योगेश पाटकर, क्रीडाक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विक्रमादित्य कांबळी, प्रणव शेट्टी, राजकीय क्षेत्रातील मंदार हळबे, पोलीस विभागात रुजू असलेले हरियाणाचे आय.पी.एस. तन्मय भोईटे, परदेशी असलेले डॉ. परेश कामत, विराज साळवी, डॉ. प्रशांत राव आदी अनेक शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.

यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी २०१६ मध्ये या सुवर्ण महोत्सवाचा समारोप होणार आहे. या समारोपात विविध कलाविष्कारांच्या पाश्र्वभूमीवर आंतरशालेय स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी उपक्रमामध्ये आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापिका मुरलीधर, उपमुख्याध्यापिका उषा कथोरे, पर्यवेक्षिका लतिका मोहनदास, वल्सा जोस, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लाली पिल्ले यांचाही मोलाचा सहभाग आहे. निवृत्त उपमुख्याध्यापिका अलका प्रभुणे व चंद्रा विल्सन या निवृत्त होऊनही त्या या महोत्सवात क्रियाशील व प्रमुख मार्गदर्शक आहेत.

Story img Loader