श्वानांना स्पर्शाची प्रेमळ भाषा कळते, असे म्हणतात. या श्वानांना जितके आपलेसे करूतितका श्वानांचा आपल्या मालकावर अधिक विश्वास जडतो आणि कायम एकनिष्ठ राहण्याचा मूक वचनाचा करार या दोघांत होतो. वेगवेगळ्या श्वानांच्या स्वभावाप्रमाणे या श्वानांशी जुळवून घेतल्यास श्वानांसारखा प्रामाणिक पाळीव प्राणी अन्य दुसरा मिळणे दुरापास्तच आहे. या श्वानांना एखाद्या व्यक्तीची अडचण अचूक कळते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. याचे कारण असे की, निरनिराळ्या जातींच्या श्वानांमधील गोल्डन रिटरिवर या श्वानांनी आपले असेच खास वैशिष्टय़ जपले आहे. आपल्या आकर्षक शरीरयष्टीमुळे श्वानप्रेमींमध्ये हे श्वान लोकप्रिय ठरतातच, मात्र अपंगांचा आधार बनून अंध व्यक्तींना दिशा दर्शवण्याचे महत्त्वाचे काम हे श्वान करत असल्यामुळे आपली विशेष ओळख या श्वानांनी जपली आहे. या श्वानांच्या शरीरावरील तांबूस लांब केस अधिक उठावदार भासत असल्याने पाहता क्षणी श्वानप्रेमींना हे श्वान पसंतीस पडतात. पूर्वी शिकार पकडण्यासाठी गोल्डन रिटरिवर श्वानांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होत होता. अलीकडे घरात पाळण्यासाठी या श्वानांचा उपयोग केला जातो. वासावरून शिकार ओळखण्याचे कौशल्य या श्वानांमध्ये असल्याने सध्या नार्को टेस्ट, बॉम्बशोध पथक, सैन्यदल, पोलीस दलात गोल्डन रिटरिवर श्वान महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावतात. १८९० च्या दरम्यान स्कॉटलंडमध्ये या श्वानांचे संदर्भ आढळले. १९०३ मध्ये इंग्लंडमध्ये गोल्डन रिटरिवर या नावाने या श्वानांची अधिकृतरीत्या नोंदणी झाली. त्या काळी शिकारीसाठी बंदुकीचा वापर होत असल्यामुळे लांब पल्ल्यावर शिकार होत असे. बंदुकीच्या साहाय्याने लांबवरची केलेली शिकार शिकाऱ्यापर्यंत आणून देण्याचे काम गोल्डन रिटरिवर हे श्वान करत. यासाठी हंटिंग डॉग किंवा गन डॉग अशी ओळख गोल्डन रिटरिवर श्वानांना प्राप्त झाली. कालांतराने प्रशिक्षणाच्या माध्यमातून या श्वानांची क्षमता ओळखली गेली आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामात या श्वानांचा उपयोग होऊ लागला. या श्वानांची उंची पंचवीस ते सत्तावीस इंचांएवढी आणि वजन साधारण पस्तीस किलोएवढे असते. दहा ते बारा वर्षांचे आयुष्य या श्वानांना असते. शुभ्र पांढरा, तपकिरी आणि सोनेरी रंग या श्वानांमध्ये लोकप्रिय आहेत.
लॅबरेडोर रिटरिवर या जातीशी साधम्र्य साधणाऱ्या गोल्डन रिटरिवर या श्वानांनी शरीरावरील लांब केसांमुळे वेगळेपण जपले आहे. सध्या जगातील लोकप्रिय श्वानजातींमध्ये गोल्डन रिटरिवर श्वानांचा तिसरा क्रमांक लागतो.
कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता
इतर श्वानांपेक्षा गोल्डन रिटरिवर श्वानांची आकलन क्षमता अधिक उत्तम आहे. प्रशिक्षणाच्या वेळी इतर श्वानांपेक्षा गोल्डन रिटरिवर श्वान कोणत्याही कृतीचे अधिक जलद आकलन करतात. इतर श्वानांप्रमाणे हेकेखोरपणा, जिद्दी, रागीट स्वभाव या श्वानांचा नसून मनमिळाऊ स्वभाववैशिष्टय़ामुळे हे श्वान अधिक पसंतीस पडतात. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचे सामथ्र्य या श्वानांमध्ये आहे. शहरातील गर्दीत वास्तव्य करणारे हे श्वान तितक्याच सक्षमपणे एखाद्या निर्जनस्थळीही उत्तमरीत्या तग धरतात हे या श्वानांचे वैशिष्टय़ मानावे लागेल. मालकाशी अतिशय प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्यामुळे श्वानप्रेमींना आपसूकच या श्वानांबद्दल आपुलकी निर्माण होते.
मूलभूत राखण करण्याची क्षमता नाही
या श्वानांचा मूळचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळाऊ असल्याने या श्वानांची कोणत्याही व्यक्तीशी मैत्री पटकन होते. या कारणामुळे घरात राखणदारीसाठी गोल्डन रिटरिवरचा उपयोग होत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा