ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने करदात्यांना १ एप्रिलपासून कराची देयके पाठविण्याबरोबरच मोबाईलवर लघु संदेश पाठविण्यास सुरूवात केली असून त्याला प्रतिसाद देत सुमारे १५७० ठाणेकर करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक कोटी ८० लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
ठाणे महापालिकेने २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेल्या ८५० कोटी रुपयांच्या उद्दीष्टापैकी ८१० कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले आहे. ९५ टक्क्यांच्या आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुलीत १०८ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
धनादेशद्वारे मालमत्ता कराचा भारणा करण्याचे प्रमाण ४१ टक्के इतके तर, ऑनलाईनद्वारे कराचा भारणा करण्याचे प्रमाण ३० टक्के इतके असल्याची बाबही समोर आली आहे. असे असतानाच, यंदाच्या वर्षातील करवसुलीला पालिकेने सुरूवात केली आहे. यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके, १ एप्रिल रोजीच पालिकेने करदात्यांपर्यत पाठवली आहेत. त्याबददलचा लघुसंदेश (एसएमएस) मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या लघुसंदेशात सन २०२५-२६ या वर्षांची देयके डाऊनलोड, छपाई (प्रिंट) करणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून (ऑनलाईन पध्दतीने) मालमत्ता कर भरणेकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर संकलन केंद्रावर मालमत्ता कर भरणेच्या सुविधेसह सुरुवात करण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे १५७० जागरूक ठाणेकर करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ८० लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच Googlepay, PhonePe, PayTm, BHIM App याद्वारे कर भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.
सर्व करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत जमा करु शकतात. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची देयके छपाई करुन प्रभाग स्तरावर करदात्यांस वितरीत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये काही कालावधी अभिप्रेत आहे. करदाते कराची देयके महापालिकेच्या संकेतस्थळावरुन तसेच कर संकलन केंद्रावरुन विनंतीद्वारे उपलब्ध करुन घेवू शकतील, असे उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे यांनी सांगितले.
कर सवलत
पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्यासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत देण्यात आली आहे. १ एपिल ते १५ जून २०२५ या काळात पूर्ण रक्कम भरल्यास १० टक्के सूट, १६ ते ३० जून २०२५ या काळात पूर्ण रक्कम भरल्यास ४ टक्के सूट, १ ते ३१ जुलै या काळात पूर्ण रक्कम भरल्यास ३ टक्के सूट आणि १ ते ३१ ऑगस्ट या काळात पूर्ण करभरणा केल्यास २ टक्के सूट देण्यात येणार आहे.