मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाही ठाण्यातील तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझा सभागृहात मात्र तुफान गर्दी झाली होती. उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली असताना आणि रस्त्यांवर पाणी साचलेले असतानाही विद्यालंकार प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार हजेरी लावली होती. उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणाचा योग्य पर्याय जाणून घेण्याच्या मार्गात आडवा येऊ पाहणाऱ्या पावसालाही विद्यार्थ्यांनी सहज बाजूला सारले.
ठाण्यातील टिपटॉप प्लाझा सभागृहात भरवण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या मार्गदर्शन कार्यक्रमाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे विविध पर्याय, करिअरच्या वेगवेगळ्या वाटा, उपलब्ध शिक्षण संस्था अशा सर्वाची माहिती देणाऱ्या या कार्यक्रमासाठी भर पावसातही विद्यार्थी-पालक मोठय़ा संख्येने जमले होते. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, ठाण्यातील लोकल सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र, याचा विद्यार्थी आणि पालकांच्या निर्धारावर अजिबात परिणाम दिसला नाही. पावसातून भिजत, वाहतूक कोंडीतून वाट काढत त्यांनी टिपटॉप प्लाझा गाठलेच.
पालकांनी कधीही न अनुभवलेली क्षमता कल चाचणी, सॉफ्ट स्किल आदींचे मार्गदर्शन या कार्यक्रमात देण्यात आले. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ नीलिमा आपटे यांनी आवडीच्या क्षेत्राचे नियोजन कसे करावे यावर भर देत विद्यार्थ्यांना क्षमता कल चाचणीचे (अॅप्टिटय़ूड टेस्ट) महत्त्व सांगितले. तसेच दुसऱ्या सदरात गौरी खेर यांनी सुरुवातीला आवडीच्या क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर काम करून मगच ते करिअर पुढे जमते की नाही हे ठरवावे, असा सल्ला दिला. करिअरची निवड अतिशय विचारपूर्वक करा, असे ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी सांगितले.
करिअर निवडीचे नियोजन व करिअरच्या वेगवेगळ्या संधी वक्त्यांकडून जाणून घेतल्यावर प्रदर्शनात विविध महाविद्यालय तसेच विषय शाखांची माहिती मिळाल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले, तर सुजाण पालकांची आपल्या पाल्याच्या करिअरसाठीची धडपड या गर्दीतून दिसून येते, असे मत टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शाह यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा