कल्याण – कल्याण शहर परिसरात काही वर्षांपासून दहशतीचा अवलंब करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या एका २७ वर्षांच्या गुंडाला ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून प्रतिबंधक कायद्याने एक वर्षासाठी गुरुवारी स्थानबद्ध करण्यात आले. या गुंडाची महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नाशिक कारागृहात रवानगी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णा दशरथ कांगणे (रा. कांगणे निवास, बाबू तेली चाळ, रामबाग गल्ली क्र. १, कल्याण पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. कृष्णावर खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवणे, विनयभंग करणे, हाणामारी, बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, असे सात गुन्हे महात्मा फुले पोलीस ठाणे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कृष्णा महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत आहे. त्याला दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. सुटकेनंतरही कृष्णाच्या वर्तनात फरक न पडता त्याची गुन्हेगारी वृत्ती वाढत होती. रामबाग परिसरातील त्याच्या दहशतीने स्थानिक रहिवासी अस्वस्थ होते.

हेही वाचा – डोंबिवलीत फेरीवाल्यांची रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण

कृष्णाच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया विचारात घेऊन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी कृष्णाला प्रतिबंधक कारवाईने स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह यांच्याकडे पाठविला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी देताच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक व्होनमाने यांनी कृष्णाला स्थानबद्ध करून त्याची रवानगी एक वर्षासाठी नाशिकच्या कारागृहात केली. या कारवाईने कल्याणमधील व्यापारी, व्यावसायिक यांनी अधिक समाधान व्यक्त केले आहे.

गुंडांच्या याद्या तयार

हेही वाचा – ठाणे : कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर्ज उभारण्याची चाचपणी

कल्याणमध्ये सतत गुन्हेगारी पार्श्वभूमीने वावरणाऱ्या, सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या सक्रिय, धोकादायक गुन्हेगारांच्या याद्या कल्याणच्या पोलिसांनी तयार केल्या आहेत. या गुन्हेगारांच्या हालचाली पाहून त्यांच्यावरही प्रतिबंधक किंवा तडीपाराच्या दृष्टीने हालचाली पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून सुरू केल्या आहेत. समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या, सतत गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goon who spread terror in kalyan sent to nashik jail ssb