कल्याण – कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गाव हद्दीतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या उंबर्डे कचराभूमीवर रात्रीच्या वेळेत सुरक्षेचे काम करणाऱ्या चार सुरक्षा रक्षकांना मंगळवारी रात्री नऊ गुंडांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या कचराभूमीवर परत दिसलात तर पुन्हा बेदम मारहाण करू, असा इशारा देऊन गुंड वाहनांमधून पसार झाले.
अचानक घडलेल्या या प्रकराने सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. ते गुंडांचा प्रतिकार करू शकले नाहीत. उंबर्डे गाव हद्दीत कल्याण डोंबिवली पालिकेची कचराभूमी आहे. आधारवाडी येथील कचराभूमी बंद करून पालिकेने उंबर्डे येथील कचराभूमी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. हा प्रकल्प उंबर्डे गाव हद्दीत आल्याने या भागातील विकासक, शेतकरी, भूमाफिया अस्वस्थ आहेत. उंबर्डे हद्दीतील कचराभूमी कायमची कशी बंद होईल. पालिकेला येथे कचरा टाकणे कसे शक्य होणार नाही यादृष्टीने मागील १५ वर्षांपासून स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा – घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू
उंबर्डे कचराभूमीच्या ठिकाणी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता यावे. तेथील प्रकल्पात समाजकंटकांनी नासधूस करू नये म्हणून पालिकेने उंबर्डे कचराभूमीवर रात्रीच्या वेळेत सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. रात्रीच्या वेळेत या भागात जे गैरप्रकार चालायचे ते सुरक्षा रक्षकांच्या तैनातीमुळे थांबले आहेत. याचा त्रास काही मंडळींना होत आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये दुचाकीच्या धडकेत गर्भवती महिला, बालिका जखमी
मंगळवारी रात्री पालिकेचे सुरक्षारक्षक अशोक निकम, सचिन पाटील, रुतिक, अभिषेक उंबर्डे कचराभूमीवरील सुरक्षा दालनात बसले होते. तेथे रात्री साडेबारा वाजता दोनजण दुचाकीवरून आले. त्यांच्या पाठोपाठ इतर सातजण इतर वाहनांमधून आले. त्यांनी उपस्थित सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करून बेदम मारहाण सुरू केली. या ठिकाणी परत दिसलात तर पुन्हा अशाच पद्धतीने मारू, अशी धमकी देऊन तेथून पळून गेले. सुरक्षा पर्यवेक्षक दिनेश शर्मा यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.