कल्याण – शिंदे शिवसेनेची कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख ते संघटक पदापर्यंतच्या सर्व महिला, पुरूष पदांना स्थगिती देण्यात आली आहे. आपल्या कामाचा आढावा घेऊन, मुलाखती घेऊन पुढील नेमणुका केल्या जातील, असे पत्र शिवसेना कल्याण पूर्व शिंदे सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी काढले आहे. या आदेशामुळे कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख ते संघटक पदापर्यंतची कार्यकारिणी या आदेशामुळे रद्द झाली आहे.

मागील पाच दिवसात कल्याण पूर्व, पश्चिमेत शिंदे शिवसेनेतील दोन गटांमध्ये हाणामारी, अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्यामुळे शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, सचिव संजय मोरे यांना या निर्णयाची जिल्हाप्रमुख लांडगे यांनी ही माहिती दिली आहे.

काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये शिंदे शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला शिंदे शिवसेनेच्या एका महिलेने मारहाण केली. कल्याण पूर्वेत शाखेतील उपोषणावरून धुसफूस सुरू होती. या सगळ्या प्रकारात पक्षाची बदनामी होत होती. पक्षाने नियुक्त्या न करता शिंदे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी ‘स्वयंघोषित’ पदाधिकारी होऊन वावरत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच अधिक झाले होते. अधिकच्या पदाधिकाऱ्यांमुळे पदनिष्ठ पदाधिकाऱ्यांंना काम करणे अवघड जात होते. या विषयीच्या अनेक तक्रारी शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांपर्यंत गेल्या होत्या, असे समजते.

मागील वर्षी लोकसभा, निवडणुकीच्या काळात अन्य पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे शिवसेनेत दाखल झाले. निवडणुकीच्या काळात या मंडळींनी जोमाने काम करावे, ते नाराज राहू नयेत म्हणून या आयारामांना शिंदे शिवसेनेत मानाची पदे देण्यात आली. काहींनी स्वताहून ही पदनाम लावून घेतली. आयारामांना नाराज करू नका, असे सूत्र असल्याने या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांविषयी कोणी काही बोलत नव्हते. आता पदनिष्ठ पदाधिकारी आणि स्वयंघोषित पदाधिकारी यांच्यातील धुसफूस वाढू लागल्याने अखेर पक्षाने काही पदांना स्थगिती दिली असल्याचे समजते.

कल्याण पूर्वेत सात उपशहरप्रमुखांची गरज असताना याठिकाणी २० जण सक्रिय आहेत. वीस विभागप्रमुखांची गरज असताना तेथे ४० जण सक्रिय आहेत. अशी प्रत्येक पदावर भाऊगर्दी झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या पदांमध्ये सुसुत्रता असावी, नियोजन पध्दतीने स्थानिक पातळीवर पक्षाचे कामकाज चालावे म्हणून कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख पदापर्यंतच्या सर्व पदांना स्थगिती देण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख पदापर्यंतच्या सर्व पदांना स्थगिती दिली आहे. संबंधितांच्या कामाचा आढावा, कार्यक्षमता पाहून आणि मुलाखत पध्दतीने नवीन नेमणुका केल्या जाणार आहेत.-गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, कल्याण