डोंबिवली : डोंबिवलीतील ज्येष्ठ डॉक्टर प्रमोद बेजकर, मेल-एक्सप्रेसचे लोको पायलट गणेश कुलकर्णी यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेंतर्गत देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. डॉक्टर बेजकर यांच्या ‘शरीराचे विलक्षण विज्ञान’ या पुस्तकास, कुलकर्णी यांच्या ‘रुळाळुबंध’ या पुस्तकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

डॉ. प्रमोद बेजकर यांच्या ‘शरीराचे विलक्षण विज्ञान’ या पुस्तकाला राज्य वाङ्मय पुरस्कारातील बाल वाड्मय विभागातील ५० हजार रूपयांचा युदनाथ थत्ते पुरस्कार, गणेश कुलकर्णी यांच्या ‘रुळाळुबंध’ पुस्तकास ताराबाई शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

डॉ. बेजकर ४२ वर्ष डोंबिवलीत ठाकुरवाडी येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत डॉ. बेजकर मागील तीस वर्षापासून कविता, गाणी, गझल, गय, हजल, भावगीत अशा कवितेच्या वेगळ्या ढंगांमध्ये लिखाण करत आहेत. ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीतील हास्यरंग, बालरंग सदरांमध्ये त्यांचे लेख, विनोदी ढंगातील लेख, कविता प्रसिध्द झाल्या आहेत. ‘कॉलेज के दिन’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे त्यांचे अल्बम प्रसिध्द झाले आहेत. ‘अलगद’ हा अशोक पत्की यांनी संगीतबध्द केलेला, ‘इंद्रधनु’ हा अनिल मोहिले यांनी स्वरबध्द केलेला भावगीतांचा अल्बम आहे. काही मराठी चित्रपटात काही गाणी त्यांनी लिहिली आहेत.

‘लोकसत्ता’च्या बालरंग पुरवणीत ‘शरीराचे विलक्षण विज्ञान’ विषयावर अनेक लेख प्रसिध्द झाले होते. या लेखावर आधारित हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. शरीर हे विलक्षण यंत्र आहे. त्यात अब्जावधी पेशी काम करतात. शरीराच्या अजबखान्याविषयी मुलांना जांभई, उचकी, ढेकर, शिंक, तिरळेपणा, तोतरेपणा का येतो, अशा अनेक गोष्टींविषयी सांगावे या कुतुहलातून हे पुस्तक आकाराला आले आहे. शासनाच्या साहित्य विभागाने या पुस्तकाची दखल घेतली याचा आनंद आहे, असे डॉ. बेजकर यांनी सांगितले.

डोंबिवलीतील साहित्यप्रेमी गणेश कुलकर्णी यांनी पश्चिम रेल्वेमध्ये मेल, एक्सप्रेसचे लोको पायलट म्हणून ३५ वर्ष नोकरी केली. आता ते चर्चगट येथील सुरक्षा विभागात मुख्य लोको निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लोकल, मेल-एक्सप्रेस चालविणाऱ्या माणसांचे आयुष्य कसे असते. रेल्वे चालकाचा भवताल किती कठीण असतो. लोकल, मेल चालविणाऱ्या माणसांविषयी सामान्यांच्या मनात नेहमी कुतुहल असते. ते कुतूहल रुळाळुबंध या पुस्तकातून प्रकट झाले आहे, असे गणेश कुलकर्णी यांनी सांगितले.

‘रुळाळुबंध’ पुस्तक प्रकाशित झाल्यावर राज्यासह देश, विदेशातून या पुस्तकाबद्दल भरभरून प्रतिक्रिया आल्या. या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अचूक पुस्तकांचे कसरदार वाचन, लिखाण केले त्याला शासनाने पावती दिली असे वाटत आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Story img Loader