जुनी इमारत पाडून नवीन इमारतीची उभारणी; ५७४ खाटांच्या रुग्णालयात कर्करोग, हृदयरोग रुग्णांवरही उपचार
विविध प्रकारच्या गैरसोयी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे ठाणे जिल्हय़ातील रुग्णांसाठी निरुपयोगी ठरत चालेल्या जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. या रुग्णालयाची सध्याची जर्जर झालेली इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी ५७४ खाटांचे नवेकोरे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी किडनी, हृदयविकार तसेच कर्करोगाच्या रुग्णांनाही उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शासकीय रुग्णालयाच्या फेरउभारणीच्या प्रस्तावास राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंजुरी दिली असून यासाठी लागणाऱ्या खर्चावर आरोग्य आणि अर्थ मंत्रालयात खल सुरू आहे. त्यावर एकमत झाल्यानंतर यासंबंधीचा अंतिम आदेश लवकरच काढला जाणार आहे, अशी माहिती या रुग्णालयाचे शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिली.
सिव्हिल हॉस्पिटल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सध्या अत्यंत सुमार दर्जाची आहे. सध्या या रुग्णालयात एका वेळी कमाल ३३६ रुग्णांना दाखल करून घेता येते. मात्र, संपूर्ण जिल्ह्य़ातील रुग्णांचा भार पेलविणे येथील व्यवस्थापनाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे येथील खाटांची क्षमता तसेच अंतर्गत सुविधा सक्षम कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. रुग्णालयाच्या पुनर्बाधणीचा एक प्रस्ताव मध्यंतरी जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यास आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
सध्या या रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञांची वानवा आहे. नव्या रुग्णालयात येथे कार्डिओलॉजिस्ट, एन्जोप्लास्टी, तसेच हृदय शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे. मेंदूच्या विकारासाठीही रुग्ण येत असतात. मात्र सध्या येथे त्याबाबत फारशा सुविधा नाहीत. नव्या योजनेत रुग्णालयात न्यूरो सर्जन विभाग असेल. सध्या कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेरपीसाठी मुंबई गाठावी लागते. त्यांच्यासाठी केमोथेरपीचा विभागही येथे सुरू करण्यात येणार आहे. किडनीग्रस्तांसाठी सात डायलिसिस यंत्रे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक आजारासाठी एक वेगळा विभाग देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्याचे शासकीय रुग्णालय तीन इमारतींत विभागले गेले आहे. या इमारतींत औषधे ठेवण्यासाठीही मल्टिस्टोअर उभारण्यात येणार आहे. रुग्णालयाची नवीन इमारत आठ किंवा दहा मजल्यांची असेल. त्यातील सगळे विभाग एकमेकांना जोडलेले असतील. तसेच भूमिगत वाहनतळाचीही सोय केली जाणार आहे.