ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असल्याने हा प्रदेश आर्थिक तंत्रज्ञानामध्ये देशाची राजधानी होऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक असलेले निर्णय राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबई विमानतळावर महिन्याभरात प्रायोगिक तत्त्वावर विमाने उड्डाण करतील आणि वाढवण विमानतळाचेही काम सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले.
ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती दिली. विविध उपकरणांमध्ये चीपचा वापर केला जातो. या चीप निर्मितीचा देशातील पहिला उद्याोग मुंबई महानगर क्षेत्रात सुरू होत आहे. याशिवाय, इतर क्षेत्रातील उद्याोगही राज्यात येत आहेत. याचा अर्थ राज्यात उद्याोग वाढीसाठी प्रचंड क्षमता असून या उद्याोग वाढीसाठी काही निर्णय घेतले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>देशामधील सर्वच मंदिरांतील प्रसादासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा; ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनची मागणी
मुंबई महानगराचा आर्थिक विकास दर ७.३० टक्के इतका असून तो २०४७ पर्यंत २० टक्क्यांवर घेऊन जायचा आहे. त्यासाठी मित्रा संस्थेने महिन्यातून एक बैठक घेऊन त्यात सर्व विभागांच्या कामाचा आढावा घ्यावा. त्यात ज्या अडचणी समोर येतील, त्या सोडविण्यासाठी निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे ४० हजार नागरिकांना घर देण्याचे स्वप्न होते. त्यासाठी योजना आणल्या पण, प्रत्यक्षात घरे मिळू शकली नाहीत. त्यामुळे योजनेतील त्रुटी दूर करून सर्व नागरिकांना घरे कशी मिळतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे ते म्हणाले.
सेवा उद्याोग व रोजगार निर्मितीसाठी चालना
मुंबई महानगर क्षेत्र आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मित्रा संस्थेने संयुक्तपणे ठाणे विकास परिषद आयोजित केली होती. यात सर्वांसाठी घरे, माहिती तंत्रज्ञान व आधारित सेवा उद्याोग, पर्यावरणीय स्थिरता आणि रोजगार निर्मिती असे पाच गट तयार करण्यात आले होते. या क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींशी चर्चा करून सविस्तर अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविण्यात आला.
‘वेदांत’वरून उद्धव ठाकरे यांना टोला
राज्यातील तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने सहकार्य केले नसल्यामुळेच वेदांत हा प्रकल्प गुजरातला गेला, अशी माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केल्यावर दिली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. कदाचित त्या कंपनीला माहीत नसावे की ते सरकार जाऊन मी मुख्यमंत्री होईन. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांनी तो प्रकल्प गुजरातला नेला, असेही ते म्हणाले.