कल्याण – गाई, म्हशींनी अधिक दुधाळ व्हावे म्हणून या दुधाळ प्राण्यांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनमध्ये लागणारे औषध बेकायदा तयार करणाऱ्या एका इसमाला कल्याण गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी कल्याण पश्चिमेतील तबेले बहुल भागातील गोविंदवाडी परिसरात अटक केली. त्याच्याकडून एक लाख ६० हजाराचा इंजेक्शनसाठी लागणारा औषध साठा जप्त करण्यात आला.
मसी सादीक खोत (५०) असे या इसमाचे नाव आहे. तो फालके इमारतीत मासळी बाजाराच्या बाजुला बाजारपेठ भागात राहतो. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, गाई, म्हशींना अधिक पान्हा येण्यासाठी, त्या अधिक दुधाळ व्हाव्यात यासाठी जी ऑक्सिटोसीन इंजेक्शने दिली जातात. त्यामध्ये टाकण्यासाठी लागणारे औषध तयार करण्याचे काम बेकायदेशीरपणे एक इसम कल्याणमधील गोविंदवाडी भागात बिस्मिल्ला हाॅटेल भागात करत आहे.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे फलक अज्ञातांनी फाडले
पोलिसांनी ही माहिती अन्न आणि औषध प्रशासन कोकण विभागाचे आरोग्य निरीक्षक संजय राठोड यांना दिली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी गोविंदवाडी मधील बिस्मिल्ला हाॅटेल भागात सापळा लावला. पोलिसांनी फालके इमारतीमधून आरोपी मसी खोत याला ताब्यात घेतले. त्याने आपण दुधाळ जनावरे अधिक पान्ह्यावर येण्यासाठी इंजेक्शनसाठी लागणारी औषधे तयार करत असल्याची कबुली तपास पथकाला दिली.
पोलिसांनी त्याला तो औषधे उत्पादित करत असलेल्या गोविंदवाडीमधील बिस्मिल्ला हाॅटेल रस्त्यावरील निसार मौलवी चाळीत नेले. एका खोलीत आरोपी मसी उत्पादित करत असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या एक हजार ६७ बाटल्या आढळल्या. हे औषध तयार करण्यासाठीचे कच्चे साहित्य, लेबल, बाटली बंद करण्यासाठीचे साहित्य आढळले.
हेही वाचा >>>डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
पोलिसांनी हे सर्व एक लाख ६० हजाराचे साहित्य जप्त केले. ऑक्सिटोसीन इंजेक्शन दुधाळ जनावरांना सतत दिल्याने त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. अशा इंजेक्शनपासून मिळणाऱ्या दुधापासून मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होतो, हे माहिती असुनही आरोपी मसी खोत हा दुधाळ प्राणी, मानवी जीवाला घातक ठरेल असे औषध बेकायदा उत्पादित करत होता. त्यामुळे पोलिसांनी मसी विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने, प्राण्यांना क्रुरतेने वागविणे प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला.
या कारवाईत कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखेडे, उमेश जाधव, अन्न व औषध प्रशासनाचे राठोड सहभागी झाले होते. उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांनी या पथकाला मार्गदर्शन केले.