राज्यात सरकार बदलले असून त्याचप्रमाणे राज्यातही सकारात्मक बदल दिसायला हवे. शहरे स्वच्छ आणि सुंदर झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील कळवा पूल लोकापर्ण कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना या बदलांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरड़ीए आणि महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा- “जितेंद्र आव्हाडांनी काही वैयक्तिक खर्चातून…”, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कौन किसकी शादी में…”!

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलावरील पोलीस मुख्यालय ते कळवा चौक आणि विटावा या मार्गिकेचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे तसेच आसपासच्या शहरातील रस्ते वाहतूक कोंडीमुक्त कसे होतील, यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका काम करीत आहे. शहरांमध्ये मेट्रोची कामे सुरु असून ठाण्यात शहरात मुख्य मेट्रोसह अंतर्गत मेट्रोचा प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. मेट्रो सुरु झाल्यानंतर नागरिक वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास करतील आणि त्यामुळे रस्त्यावर फारशी वाहने येऊन कोंडी होणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. आम्ही लोकांसाठी सरकार बनविले असून हे सरकार जनतेसाठी काम करणार आहे. त्यामुळे जनतेच्या फायद्याचे जे काही असेल ते सर्व हे सरकार करणार आहे. त्यासाठी आमदार, खासदारांच्या सर्व सुचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. कोपरी रेल्वे पुलाची मार्गिकाही लवकरच सुरु केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. विटावा आणि कोपरी पादचारी पुलाचे काम एमआरडीएने केले असून हा पुलही लवकर कसा खुला होईल. त्याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष दयावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा- ‘ती’ चित्रफीत प्रसारित करत खोटा गुन्हा नोंदविला; जितेंद्र आव्हाड यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट चर्चेत

प्रकल्पांची घोषणा

ठाणे तसेच आसपासची शहरे वाहतूक कोंडीमुक्त व्हावी यासाठी शहराबाहेरून ११०० ते १३०० कोटी रुपये खर्चुन रस्ता तयार करण्यात येणार आहे. मुंबई फ्री वे हा रस्ता घाटकोपर येथील छेडानगरपर्यंत येणार आहे. तो रस्ता पुढे ठाणे मार्गे फाऊंटनपर्यंत नेण्यात येणार आहे. याशिवाय, तीन हात नाका, कॅडबरी या महत्वाच्या जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रेड सेप्रेटर आणि गाड्या वळविण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. कोपरी रेल्वे पुलाची मार्गिकाही लवकरच सुरु केली जाणार आहे. ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोचा प्रकल्पही राबविण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारही सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कळवा येथील ९० फुटी रस्ता मुंबई-नाशिक महामार्गाला जोडला तर त्या भागातील वाहतूक कमी होईल. त्यामुळे या मार्गिकेच्या जोडणीचे काम करण्यात यावे आणि कळवा नवीन खाडी पुलामुळे भविष्यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या पुलाची मार्गिका पटनीपर्यंत उतरविण्यात यावी, असेही निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा- डोंबिवली: रस्त्यांची कामे सुरू होताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लावले मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे फलक

टोलेबाजी आणि शक्तीप्रदर्शन

कळवा नवीन खाडी पुलाची मार्गिका विटावा येथे उतरविण्यात आली आहे. परंतु या मार्गिकेच्या पुढेच सब-वे असल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठीपुलाची मार्गिका पटनीपर्यंत नेणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना प्रतिउत्तर देत टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, एमएमआरडीए हे विभाग आहेत. या विभागाच्या आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे तुमच्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडेच असायला हव्यात, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला. तर लोकांच्या फायद्यासाठीच आम्ही हे सरकार बनविले असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हाड यांना लगावला. पोलीस मुख्यालयासमोरील पुलाच्या मार्गिकेजवळ लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. परंतु पुलाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच कळवा चौकात राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. याठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण होते.