बदलापूर पालिकेमध्ये विषय मंजुरीत तांत्रिक अडचण; गणेश विसर्जनासाठी सोय करण्यात प्रशासकीय दिरंगाई

ठाणे महानगरपालिकेसह जिल्ह्य़ातील अन्य महानगरपालिकांनी गणपती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावांची बांधणी केली असली तरी गेल्या चार-पाच वर्षांपासून नियमितपणे कृत्रिम तलाव बांधणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने यंदा केलेली दिरंगाई चर्चेचा विषय ठरली आहे. सभागृहात विषयांच्या मंजुरीदरम्यान उभ्या राहिलेल्या तांत्रिक अडचणींमुळे यंदाच्या वर्षी शहरात नगरपालिकेच्या वतीने एकही कृत्रिम तलाव उभा राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपालिका हद्दीत उल्हास नदीवर दोन ठिकाणी, पूर्वेकडील गावदेवी तळे, बेलवली येथील तळे, कात्रप येथील गणेश घाट आदी ठिकाणी नैसर्गिक स्रोतांवर गणपती विसर्जन करण्यात येते. हा ताण काहीसा कमी व्हावा व गणपती विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे यासाठी बदलापूर नगरपालिका बदलापूर गाव रस्त्याजवळील उल्हास नदीच्या पात्राजवळ गेल्या चार-पाच वर्षांपासून कृत्रिम तलाव बांधत आहे. या वर्षी तलाव न बांधल्याने अनेक स्तरावरून पालिकेवर टीका होत आहे. यामागचे मूळ कारण हे आता उघड होत असून पालिकेच्या एका सभेत कृत्रिम तलावाचा ठराव हा आयत्या वेळच्या विषयात घेण्यात आला होता. मात्र, या सभेनंतर नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत गेल्या सभेचे इतिवृत्त वाचन करताना सभागृहाने हा ठराव फेटाळला होता. कारण, हे काम दहा लाखांच्या घरात प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र आयत्या वेळच्या विषयात मोठय़ा आर्थिक रकमेची कामे मंजूर होत नसल्याने सभागृहाने हा ठराव फेटाळून लावल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
त्यामुळे कृत्रिम तलावाचे काम मंजूर न झाल्याने यंदा कृत्रिम तलाव बांधण्यात आला नाही. तसेच, एखादा कृत्रिम तलाव लाख रुपयात होणे अपेक्षित असताना दहा लाखांच्या घरात प्रस्तावित करण्यात आल्यानेदेखील अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हा विषय मंजूर न होण्यामागे प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असून हा ठराव आयत्या वेळी घेण्यात येणाऱ्या विषयांमध्ये येणे हे नियमास धरून नाही. याबाबत विषयपत्रिका बनवताना प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने तो इतिवृत्त वाचनाच्या वेळी फेटाळण्यात आला, असे भाजपा नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सांगितले.
आजी-माजी लोकप्रतिनिधींचा
कृत्रिम तलावासाठी पुढाकार
या पाश्र्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी कृत्रिम तलावांच्या उभारणीसाठी प्रयत्न केल्याचे चित्र यंदा दिसून आले. शिरगाव येथे विद्यमान नगरसेवक अरुण सुरवळ यांनी त्यांच्या प्रभागात तर, माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनीदेखील त्यांच्या विभागात कृत्रिम तलाव बांधून विसर्जनाला येणाऱ्या नागरिकांची सोय केली आहे.

Story img Loader