लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर: गेल्या काही दिवसात महावितरणच्या धाडसत्रामध्ये घरगुती वीज वापरातील अनेक चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. मात्र अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाईत चक्क ग्रामपंचायतीकडूनच वीज चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. काराव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी चोरीच्या विजेचा वापर केला जात होता. ग्रामपंचायतीने २७ लाख ४६ हजार रुपये किमतीची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बाटलीबंद पाण्याचा कारखाना आणि जीन्स धुलाई करणाऱ्यांकडूनही विजेची चोरी केली जात असल्याचे आढळले आहे. कल्याण मंडळाच्या कार्यालय दोनच्या महिला अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने एकाच दिवसात तब्बल एक कोटी १५ लाखांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.

कल्याण मंडळ कार्यालय दोन अंतर्गत उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बदलापूर पश्चिमेतील कारव परिसरात तपासणी मोहिम राबवली. यात कारव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मीटर टाळून थेट वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. अधिक तपासणीत ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २७ लाख ४६ हजार रुपये किंमतीची १ लाख २४ हजार ८४० युनिट वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. चक्क ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेसाठी वीज चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. तर याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोरया ब्रेव्हरिज या बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. या कारखान्याने सुमारे ८६ लाख २८ हजार रुपयांची ३ लाख ९२ हजार २०६ युनिट वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. तर तिसऱ्या ठिकाणी स्वप्नील शेवाळे याच्या जीन्स धुलाई आणि डाईंग कारखान्यात मीटर टाळून थेट वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. याठिकाणी १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची ९ हजार १८ युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचे निष्पन्न झाले.

आणखी वाचा- ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी टोकदार दिशादर्शक प्रवाशांना मारक

या तिन्ही ग्राहकांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून विहित मुदतीच्या आत देयकाचा भरणा न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी या धडक कारवाईबाबत महिला अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाचे कौतूक केले. उपकार्यकारी अभियंता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता नेहा ढोणे, जनमित्र रमेश शिंदे, प्रशिक्षणार्थी प्रथमेश जाधव, चालक सुर्यकांत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat itself stole electricity worth 27 lakhs mrj