पिसवली ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत शिवसेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादी कॉग्रेसला फायदा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राष्ट्रवादीचे कैलास भोईर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला मतदान करत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचे उट्टे काढल्याचे चित्र दिसले.
कल्याण तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी पिसवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीचे कैलास भोईर निवडून आले आहेत. त्यांना १७ पैकी ११ मते पडली. पिसवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला शिवसेनेने मतदान केल्याने राष्ट्रवादीचा सदस्य सरपंचपदी निवडून आला. तर राष्ट्रवादीने शिवसेनेच्या सुरेखा म्हात्रे यांना उपसरपंचपदी निवडून आणले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या निवडणूकीत भाजपने शिवसेनेला दिलेला दगाफटका पुन्हा त्यांच्यावर उलटविण्यासाठी पिसवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने भाजपाला मदत न करता राष्ट्रवादीचे भोईर यांना मदत केली. पिसवलीमध्ये सहा प्रभागातून १७ सदस्य निवडून आले होते. त्यात शिवसेनेचे चार, भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे सात तर रिपब्लिकीन पक्षाच्या एका सदस्याचा समावेश आहे. शिवसेना व भाजपाच्या भांडणात परिवहन सभापती आणि पिसवली सरपंच या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा फायदा झाला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर युती निव्वळ नावापुरती उरली असल्याचे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा