मराठय़ांच्या इतिहासात वसईच्या मोहिमेचा उल्लेख केल्याशिवाय कोकणातल्या मराठय़ांच्या कर्तृत्वाचा इतिहास पूर्ण होणार नाही. कल्याण प्रांतात मराठय़ांचा अंमल सुरू झाल्यानंतर आसपासच्या प्रदेशांतील पोर्तुगीजांच्या साम्राज्याला आव्हान देण्यास मराठय़ांनी सुरुवात केली. वसईच्या मोहिमेत माहिमच्या किल्लय़ावर हल्ला चढवण्यात आला, त्यास प्रत्युत्तर देताना दोन ते तीन हजार पोर्तुगीज सैन्य बाहेर पडले. पोर्तुगीजांच्या हल्ल्यामुळे दाणादाण उडालेल्या मराठय़ांच्या सैन्यास किल्लय़ात राहून प्रतिकार करणे अशक्य झाले, बाहेर पडणेही शक्य न झाल्याने अखेर दहा ते पंधरा महत्त्वाचे लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाले. त्यात महत्त्वाचे नाव होते ते राणे घराण्यातील राजबाराव बुरूडकर. त्यांच्या या पराक्रमावर खूश होऊन चिमाजीअप्पा यांनी वांगणीजवळील डोणे हे उल्हास नदीकाठचे गाव राणे घराण्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना इनाम दिले. तेव्हापासून डोणे हे गाव राणे घराण्यांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांचा राणे वाडा बांधला. १७३७ नंतर साधारणत: अडीचशे वर्षांनंतरही आजही हा वाडा भक्कमपणे उभा आहे.
कोकण, कल्याण तसेच मुरबाड परिसरांत अगदी सातवाहन काळापासूनचे इतिहासाचे संदर्भ सापडतात. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा या परिसरात अजूनही अस्तित्वात आहेत. बदलापूरपासून काही किलोमीटरवर असलेल्या वांगणीजवळील डोणे हे गाव ऐतिहासिकदृष्टय़ा आजही महत्त्वाचे आहे हे तेथील राणे घराणे आणि त्यांच्या राणे वाडय़ामुळे. कल्याण-कर्जत महामार्गावर वांगणी स्थानकापासून अवघ्या काही किलोमीटरवर पश्चिम भागातील डोणे गावात राणे वाडा आहे. जवळपास दीड एकरवर पसरलेला हा वाडा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. वाडय़ाच्या प्रवेशद्वारावर वड, पिंपळ आणि उंबराचे त्रिवेणी संगम असलेले भले मोठे वृक्ष आपले जणू स्वागत करते. दत्तप्रभूंचे पवित्र स्थान असल्याने आजही त्याची पूजाअर्चा करण्यासाठी अनेक घराणी येथे येत असतात. मुळात या पवित्र स्थानाला प्रमुख मानूनच वाडय़ाची निर्मिती केली गेली असेही सांगण्यात येते. सध्याच्या राणे वाडय़ाचे स्थान हे वेगळे होते. मात्र गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध पाण्याचा प्रवाह होत नसल्याने वाडा स्थलांतरित करण्यात आला होता. सध्या अस्तित्वात असलेल्या वाडय़ापासून हाकेच्या अंतरावर वाडय़ाचे जुने अवशेष आजही पाहावयास मिळतात. वाडय़ाच्या प्रवेशद्वारापासूनच आपल्याला त्याची भव्यता आणि भक्कमता जाणवत असते. भल्या मोठय़ा अंगणातून वाडय़ात प्रवेश करताना वाडय़ाची साचेबद्ध रचनाही आपल्याला वाडय़ाच्या प्रेमात पाडते. पडवीत आत प्रवेश केल्यानंतर ओसरीतून आपल्याला सागवानी लाकडाचे सुबक खांब नजरेस पडतात. खांबांना आधार देत उभ्या असलेल्या चुन्यातील भिंती आजही त्यांची ताकद दाखवताना दिसतात. ओसरीतून माजघरात प्रवेश करत असताना मोठा नक्षीदार आणि भक्कम दरवाजा लागतो. त्यावरील नक्षी आपल्याला काही मिनिटे थांबवल्याशिवाय राहत नाही. दोन ते अडीच फूट जाडीची भक्कम भिंत माजघरात जाताना लागते. माजघरातून दरवाजा लावताना कडीसोबत असलेला अडसडा किंवा आडणा आजही त्याचे महत्त्व दाखवून देतो. माजघराच्या पूर्वेस एक छोटेखानी मंदिर आहे. राणे घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीचे अस्तित्व आजही कार्याची प्रेरणा देताना दिसते. मानाची नक्षीकाम असलेली तलवारही सध्या येथेच ठेवण्यात आली आहे. स्वरक्षणासाठी राणे घराण्याला देण्यात आलेली बंदूकही येथे असते. मात्र भारतीय निवडणुकांचा फटका बसत असल्याने अनेकदा ही बंदूक शासनाच्या दप्तरात दिसते. माजघरापुढे एक राहण्याची खोली, स्नानगृह, स्वयंपाकाची खोली आणि पुन्हा पडवी आहे. जेथे पूर्वी दूधदुभती जनावरे आणि त्यांच्यापासून काढलेले दूध, त्यापासून बनवलेले ताक (जे साधारणत: दररोज दोनशे ग्रामस्थांना वाटले जात असे.) ठेवण्याची जागा होती. मागे पाण्यासाठी विहीर आहे. आताही येथील पाणी पिण्यायोग्य असून वाडय़ासाठी हा एक महत्त्वाचा जलस्रोत आहे.
घरात माजघराशेजारी एक खंदकही आहे. ब्रिटिशकाळात अनेक क्रांतिकारकांना लपण्यासाठी येथे जागा दिली जात असे. हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रिटिश छावणीला न घाबरता बाबाजी चंद्रराव राणे आपल्या घरात क्रांतिकारकांना आश्रय देत. स्वातंत्र्यसेनानी भाई कोतवाल यांनीही अनेकदा राणे वाडय़ात आश्रय घेतल्याचा इतिहास सध्या वाडय़ाची देखभाल करणारे वामनराव राणे सांगतात. खंदकाचा मार्ग पुढे भुयारी मार्गाने एका रस्त्याला जोडला गेल्याचे संदर्भही ऐकल्याचे राणे सांगतात. मात्र अनेक वर्षे झाल्याने त्याचा शोध घेतला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
खालच्या मजल्यावरून फेरफटका मारल्यानंतर आपण पहिल्या मजल्यावर जातो. पुरुषांसाठी असलेल्या समोरच्या भागातून आणि महिलांसाठी मागच्या भागातून अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर जाता येते. ओसरीत आलेल्या आणि माजघरात प्रवेश करणाऱ्या शत्रूवर हल्ला करण्याची सोय ओसरीवरच्या पहिल्या मजल्यावरच्या भागात होती. शस्त्र लपवणे व छुप्या पद्धतीने हल्ला करणे येथून शक्य होत असे. येथे नंतरच्या काळात बाबाजी राणे भजन आणि कीर्तन करत असत. रसिकमनाचे बाबाजी राणे यांनी कला, क्रीडा जोपासण्यासाठीही प्रयत्न केल्याचे त्यांचे वंशज अमित राणे सांगतात. डोणे गावात दामले यांची नाटक कंपनी होती. त्यातून संत तुकाराम, राजा हरिश्चंद्र, भक्त पुंडलिक, मानापमान अशी अनेक गाजलेली नाटके गावातील विविध सणांच्या मुहूर्तावर होत असत. बाहेरही त्याचे प्रयोग होत. नंतरच्या काळात ही कंपनी बाबाजीरावांनी खरेदी केली. त्यातील अनेक नाटकांची वस्त्रे, साहित्य, पडदे आजही पहिल्या मजल्यावर एका पेटीत सुरक्षित ठेवलेली पाहावयास मिळतात. त्यातील अनेक वस्तू उपयोगासाठी वाटण्यात आल्या आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात याची नोंदही असणे गरजेचे आहे.
सध्या वाडा भक्कमपणे उभा आहे. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती करणे अतिशय अवघड असल्याचे अमित राणे सांगतात. दिवसेंदिवस जीर्ण होत जाणाऱ्या लाकडी सांगाडय़ावर आणखी भार नको म्हणून संपूर्ण वाडय़ात राहत असलेले अठरा सदस्यांचे कुटुंब हळूहळू वाडय़ावरील भार कमी करत आहेत. वाडय़ाच्या परिसरात काही बंगले बांधले जात आहेत. ज्यामुळे वाडय़ाचे आयुष्य आणखी काही वर्षे राहण्यास मदत होणार आहे. वाडा पांढरा हत्ती असला तरी आमच्या पूर्वजांची ही पुण्याई असून त्याचा संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे अमित राणे सांगतात. सध्या येथे वामनराव राणे सपत्नीक राहतात. गणेशोत्सव आणि दिवाळी अशा सणांना सर्व एकत्रित जमतात. वांगणी आणि बदलापूरकरांसाठी हा वाडा म्हणजे मानाची गोष्ट आहे.
हुबेहूब दुसरा वाडा
राणे घराण्यातील सदस्यांची संख्या वाढू लागताच भविष्यात वाडा कमी पडू लागला. त्यानंतर वाडय़ापासून काही मीटर अंतरावर साधारणत: ५० वर्षांनंतर दुसरा वाडा बांधण्यात आला. त्याचेही रूपही हुबेहूब पहिल्या राणे वाडय़ासारखे आहे.
राणे वाडा, डोणे, वांगणी, तालुका- अंबरनाथ