डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका सहा वर्षाच्या रुपवान बालिकेला गुंगीचे औषध देऊन तिच्या मदतीने भिक्षा मागणाऱ्या तिच्या आजी-आजोबांना डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बालिका आजी-आजोबांची खरच नात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी तेजस्विनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे.बालिकेचा ताबा बाल सुरक्षितता सामाजिक विकास विभागाकडे देण्यात आला आहे. या बालिकेची भिक्षा मागण्यातून सुटका करण्यात मनसेचे आ. प्रमोद पाटील, तेजस्विनी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, सदस्या माया कोठावदे, सायली शिंदे, तृप्ती माने, संदीप म्हात्रे, प्रेम पाटील आणि मनसेच्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
लता अरगडे यांनी सांगितले, गुरुवारी रात्री साडे आठ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकातील कोपर बाजुकडील स्कायवाॅकवर एक वृध्द जोडपे एका रुपवान बालिकेला कपड्यावर झोपवून तिच्या साहाय्याने भिक्षा मागत होते. वृध्दांकडे बघून बालिका या दाम्पत्याच्या नात्याची नसावी असा संशय नोकरदार माया कोठावदे यांना आला. त्यांनी हा प्रकार सायली शिंदे यांना सांगितला. माया कामावरुन कोपर येथे घरी चालल्या होत्या. त्यांनी मागेतकऱ्यांची छायाचित्रे काढून ती अध्यक्षा अरगडे यांना पाठविली. माया, सायली यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात जाऊन मागतेकऱ्यांची तक्रार केली. तेथील पोलिसाने असे लोक रोजच स्कायवाॅकवर बसलेले असतात असे उलट उत्तर देऊन तक्रारीकडे दुर्लक्ष केले. संदीप म्हात्रे यांचे मित्र प्रेम पाटील यांनीही हा प्रकार पाहून पोलिसांकडे तक्रार केली.
हेही वाचा : ठाण्यात मुलांचे पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने एका महिलेला बेदम मारहाण
अरगडे यांनी तात्काळ डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर ढगे, रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक मनोहर यांना घडला प्रकार सांगितला. वृध्दांची माया यांनी मोबाईलवरुन छायाचित्रे काढल्याने आपल्यावर पाळत आहे असा विचार करुन दाम्पत्य स्कायवाॅकवरुन पसार झाले. उपनिरीक्षक मनोहर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रेल्वे स्थानक भागात वृध्द दाम्पत्य बालिकेचा शोध सुरू केला. अरगडे यांनी आ. प्रमोद पाटील यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती ट्वीट माध्यमातून सर्व वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. आ. पाटील यांच्या सूचनेवरुन मनसेचे २५ हून अधिक कार्यकर्ते डोंबिवली रेल्वे स्थानकात आले. सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांच्या पुढाकाराने मनसे कार्यकर्त्यांनीही मागतेकऱ्यांचा शोध सुरू केला.
रेल्वे स्थानक परिसरात मागतेकरी दाम्पत्य आणि बालिकेला पोलिसांना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. निळ्या सालदार काळे (८२, रा. बिटकेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), नाशिका काळे (७२) अशी वृध्द दाम्पत्याची नावे आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या बालिकेचे नाव आशिना कैलास भोसले (७, रा. कड आष्टी, सराटे वडगाव, जि. बीड) आहे. दाम्प्त्याने ही माहिती पोलिसांना दिली. आशिना ही आपली नात आहे, असे दाम्पत्य पोलिसांना सांगते. या प्रकरणात संशय येत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी तेजस्विनी प्रवासी महासंघाच्या, मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.बालिकेला भिक मागण्यास भाग पाडून तिच्या साहाय्याने उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात संदीप म्हात्रे (रा. दीप वैभव सोसायटी, म. फुले रोड, डोंबिवली) यांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पावसाळ्यातच ठाणेकरांना अनुभवायला मिळतोय हिवाळ्यासारखा गारवा
पळविणाऱ्या टोळीची अफवा
मुले पळविणारी टोळी कल्याण डोंबिवलीत सक्रिय असल्याची अफवा बुधवार पासून अज्ञात व्यक्तिने समाज माध्यमावर पसरवली आहे. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. अशी कोणतीही टोळी शहरात सक्रिय नाही, असा खुलासा पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी केला आहे. ही अफवा पसरविणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.