डोंबिवली- ज्येष्ठ ग्राफिक्स डिझायनर आणि जे. जे. स्कूल् ऑफ अप्लाईड़ आर्ट संस्थेचे माजी विद्यार्थी अभिजित चौबळ यांच्या लाकडी भित्ती चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री १५. १६ ऑक्टोबर रोजी डोंबिवली पूर्व रामनगर मधील आनंद बालभवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजित चौबळ यांच्या ‘द अर्बन पॅलेट’ या संस्थेतर्फे आयोजित हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ७.३० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनातील लाकडी चित्रे पाहण्या बरोबर खरेदी करण्याची संधी संयोजकांनी उपलब्ध करुन दिली आहे. विविध विषयांशी संबंधित ४० लाकडी कोरीव कामाची चित्रे या प्रदर्शनात नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस शपथपत्राप्रकरणात मुख्य सुत्रधाराचा शोध घ्यावा ; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची मागणी

चित्रकला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून या लाकडी चित्रांच्या कलाकृती चौबळ यांनी तयार केल्या आहेत. या कलाकृती त्यांनी स्वताच्या हाताने कलाकुसरीने रंगविल्या आहेत. घरातील शय्याखोली, ओटी, देवघर, सदनिका, सभागृह, घराच्या प्रवेशव्दारांच्या सुशोभिकरणाचा विचार करुन या कलाकृती चौबळ यांनी तयार केल्या आहेत.

लाकडामध्ये कलाकुसर केलेल्या सूर्यदेव, ढाल, श्रीराम, स्वामी समर्थ, ओम, पांडुरंग विठ्ठल, ध्यान चक्र, श्वान, विविध देवतांचे मुखवटे, महावृक्ष, सिंह, रोमन ढाल, मेक्सिकन आदिवासी कला, शिवशंभो, राजचिन्ह, घोडा मुखवटा अशा अनेक कलाकृती नागरिकांना पाहण्यास आणि खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. या कलाकृतीं बद्दल चौबळ यांनी सांगितले, मी ३५ वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केले आहे. करोना महासाथ सुरू झाली. टाळेबंदी लागली. घरात बसून करणार काय म्हणून नावीन्यपूर्ण काही करावे या विचारातून भिंती सुशोभिकरणासाठी लाकडी चित्रे तयार करण्याची कल्पना सुचली. घरगुती पध्दतीने हे काम सुरू केले.

करोना काळात अशी ५० लाकडी चित्रे तयार केली. या कामाला अनेकांनी पसंती दिली. ही चित्रे घरात ठेवण्यापेक्षा त्यांचे प्रदर्शन लावावे म्हणून पुणे येथे जूनमध्ये पहिले प्रदर्शन लावले. या प्रदर्शनातील ५५ पैकी २५ चित्रे विक्री झाली. या कलाकृतीना रसिक चांगला प्रतिसाद देतात हा विचार करुन अशाप्रकारच्या कलाकृती आता तयार करतो. डोंबिवलीत राहत असल्याने येथे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील रसिकांना या कलाकृती पाहता, खरेदी करता याव्यात या उद्देशातून हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Graphics designer abhijeet chaubal wooden wall paintings exhibition in dombivli zws
Show comments