मागील लेखामध्ये आपण भारतातील सर्वात मोठय़ा फुलपाखराची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण सर्वात लहान फुलपाखरांची ग्रास ज्वेलची माहिती घेणार आहोत.
ग्रास ज्वेल हे लायकेनिडे कुळामधील फुलपाखरू आहे. ही फुलपाखरे साधारणत: (ब्लुज निळी) या नावाने ओळखली जातात.
हे फुलपाखरू पांढऱ्या करडय़ा रंगाचे असते. यांच्या मागील आणि पुढील दोन्ही पंखांच्या खालच्या बाजूच्या किनारीला पांढऱ्या तुटक रेषांचे पट्टे असतात. (पुढील पंखावर ३ पट्टे तर मागील पंखावर ४ पट्टे) या पट्टय़ांच्या आतील बाजूस एक काळ्या ठिपक्यांची भरीव माळ असते. या काळ्या ठिपक्यांना पांढरी बॉर्डरही असते. मागील पंखावर काळ्या ठिपक्यांच्या भोवती भडक पिवळ्या व पांढऱ्या रंगाचे आवरण असते. हे फुलपाखरू फुलांवर बसताना पंख दुमडून बसतात. आणि हे ठिपके ठळकपणे उठून दिसतात. हे ठिपके भक्षकांना चकवण्याचे काम करतात.
या फुलपाखराने पंख उघडले की आपल्याला त्यांच्या पंखांची वरची बाजू दिसते. ही बाजू करडय़ा रंगाची आणि मखमली असते.
या फुलपाखरांचा आकार फारच लहान म्हणजे फक्त ५ ते ७ मि. मि. एवढाच असतो. आणि त्यामुळे हे फार पटकन दिसत नाही. मात्र आपल्या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगामध्ये मोकळ्या माळांवर, फार काय शहरांमधील बागांमध्ये किंवा अगदी रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या गवतावरसुद्धा हे फुलपाखरू हमखास आढळते. खुपदा असं होत की, ज्या फुलांवर हे बसते, त्यांचाच आकार कैक पट मोठा असतो. मग फुलपाखराने हालचाल केली तरच त्याचे अस्तीत्व जाणवते.
या फुलपाखराच्या जीवन क्रमाविषयी खूप माहिती मिळवणे अजून बाकी आहे. परंतु ही फुलपाखरे क्रोटीलिया प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात आणि त्यांच्याच पानांवर त्यांचे सुरवंट वाढतात.