भिन्नमती मुलांचा कायमस्वरूपी सांभाळ करणाऱ्या डोंबिवलीजवळील खोणी येथील अमेय पालक संघटनेच्या ‘घरकुल’ मध्ये गेल्या रविवारी कृतज्ञता दिन साजरा झाला. संस्थापक मेजर ग. कृ. काळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या दिवशी घरकुलच्या हितचिंतकांचे स्नेहसंमेलन होते.
सकाळच्या सत्रात विशेष मुलांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यानंतर घरकुलमधील विशेष मुलांनी लेझीमच्या तालात पुष्पवृष्टी करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेशी निगडित असलेले न्यायमूर्ती अभय ओक, ख्यातकीर्त अस्थिव्यंगतज्ज्ञ आणि स्पाइन शल्य विशारद डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर, प्रख्यात ओन्कोलॉजिस्ट डॉ. अनिल हेरूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. सुहेल लंबाते यांचा सन्मान करण्यात आला. शस्त्रक्रिया अथवा प्रदीर्घ आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या तसेच घरात कुणीही काळजी घेण्यास नसलेल्या रुग्णांची देखभाल डॉ. लंबाते त्यांच्या कंपानीयन हेल्थकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून घेत आहेत. या समारंभास खोणी गावच्या सरपंचही उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विशेष मुलांच्या सामुदायिक प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली. ‘याला जीवन ऐसे नाव’ या गीतावरही समूहनृत्य सादर झाले. गेली दहा वर्षे मुंबईतील विलेपार्ले येथील नालंदा नृत्य महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी कृतज्ञता समारंभात नृत्य सादर करीत आले आहेत. यंदाही त्यांनी अतिशय विलोभनीय नृत्य सादर केले. संस्थेत प्रदीर्घ काळ सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या तारा शर्मा ऊर्फ सर्वाच्या लाडक्या भाभींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्या वेळी विशेष मुलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. संस्थेच्या निरनिराळ्या विभागांत आपापल्या वाटय़ास आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली. डोंबिवली येथील शीतल सव्र्हिसेसच्या श्रीराम देवस्थळी यांनी एक सामाजिक जाणीव म्हणून उपस्थित ४५० जणांच्या भोजनाची व्यवस्था केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा