आवक वाढल्याने वाटाणा स्वस्त; उत्तम प्रतीचा मटार ३५ रुपये
इतर भाज्यांच्या तुलनेत चढय़ा दरांमुळे नेहमीच भाव खाणारा मटार यंदा ऐन श्रावणात स्वस्त झाला आहे. चालू महिन्यापासून मुंबई, ठाण्यातील बाजारांत मटारची आवक मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे दरांत मोठी घट झाली आहे. पुणे, नाशिक, सासवड या भागांतील शेतकऱ्यांनी यंदा मटारचे चांगले उत्पादन घेतले असल्यामुळे बाजारात मटारचा तोरा उतरला आहे. घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा मटार ३० ते ३५ रुपयांना विकला जात आहे.
पुणे, नाशिक, सासवड, पाटण यासारख्या भागात मटारचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारात ताजा, टवटवीत मटार येण्यास सुरुवात होते. या काळात मटार किंवा वाटाण्याचे घाऊक दर ४०-५० रुपयांपर्यंत स्थिरावतात. मात्र वर्षांच्या इतर कालावधीत त्याचे दर ७० रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक असतात. किरकोळ बाजारात तर उत्तम प्रतीचा मटार १०० रुपये किलोने विकला जातो. यंदा हे चित्र बदलले आहे.
शेतकऱ्यांनी उत्तम पावसाचे चित्र पाहून यंदा वाटाण्याचे मोठे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मोठी आवक सुरू झाली असून दर ३० ते ३५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. किरकोळीत पन्नास रुपये किलो दराने मटारच्या शेंगांची विक्री होत आहे. वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी अनुक्रमे ३०० आणि १५० क्विंटल मटारची आवक झाली. ऑगस्ट महिन्यात दरवर्षी होणाऱ्या सरासरी आवकपेक्षा हे प्रमाण जास्त असल्याचे वाशीतील भाजी व्यापारी संदीप मालुसरे यांनी सांगितले. कल्याण बाजार समितीमध्ये सोमवारी शिमल्यातून ६० क्विंटल मटारची आवक झाल्याची माहिती समितीचे यशवंत पाटील यांनी दिली. यंदा चांगला पाऊस झाल्याने मटारचे उत्पादनात वाढ झाल्याची माहिती गुरुनाथ विशे या शेतकऱ्याने दिली. एरवी थंडीमध्ये बडोदे, खानदेश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या ठिकाणी वाटाण्याचे पीक काढले जाते.
स्वस्ताईचा श्रावण
आषाढ महिना संपताच श्रावणाच्या सुरुवातीपासूनच भाज्यांचे दर वाढू लागतात असा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र पुणे, नाशीक जिल्ह्य़ातून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांना होणारी भाज्यांची आवक उत्तम सुरू असून यामुळे भाज्यांचे दरही आवाक्यात आहेत. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी आवारात एरवीपेक्षा १०० हून अधिक वाहने येत असल्याने मागणी वाढूनही पुरवठा कमी झालेला नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. परिणामी, भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत.