एकीकडे ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात दिवसेंदिवस काँक्रीटचे जंगल वाढत असताना मुरबाड आणि शहापूर या ग्रामीण भागात मात्र सामूहिक वनहक्कांमुळे उजाड माळरानांवर पुन्हा हिरवाई बहरू लागली आहे. त्यातही मुरबाडमध्ये ग्रामस्थांनी दाखविलेला उत्साह लक्षणीय आहे. या सामूहिक वनहक्कांमुळे आदिवासींनी त्यांच्या वाटय़ास आलेल्या जंगलपट्टय़ांचे चांगल्या पद्धतीने जतन केल्याचे दिसून आले आहे. त्याची दखल घेत अलीकडेच दस्तुरखुद्द राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुरबाडमधील भांगवाडी या दुर्गम भागातील गावातील रहिवाशांना सामूहिक वनहक्काचे अधिकार दिले. या हक्कांमुळे  भांगवाडीसह दुर्गापूर, पेजवाडी, शिसेवाडी आणि भेरेवाडीतील रहिवासीही वस्तीलगतच्या जंगलपट्टय़ाचे मालक झाले आहेत. मुरबाडमधील १४ गावांना एकूण एक हजार ७६ हेक्टर १७ गुंठे जागेवरील जंगलांचे हक्क मिळाले आहेत. अशा प्रकारे स्थानिक ग्रामस्थांना वनसंपदा जोपासण्याच्या कामात सहभागी करून घेतल्याने स्थानिकांना रोजगार मिळालाच, शिवाय जंगलातील दुर्मीळ वनस्पतींचे जतन, संवर्धनही झाले आहे. त्याचे दृश्य परिणामही दिसून आले आहेत. वणव्यामुळे जंगलांचे फार मोठे नुकसान होते, मात्र ग्रामस्थांनी घेतलेल्या दक्षतेमुळे गेली तीन वर्षे येथील जंगल वणवामुक्त आहे. मुरबाडमधील जंगलात वर्षभरात साधारण ६० प्रकारच्या रानभाज्या तसेच अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या पुढाकाराने भांगवाडी येथे भरविण्यात आलेल्या हिरव्या देवाच्या जत्रेत त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महिलांनी २५ प्रकारच्या भाज्या शिजवल्या होत्या.
जाळरेषा, खंदक आणि दंड
कळत-नकळतपणे लागणारे वणवे रोखण्यासाठी ग्रामस्थ दरवर्षी डिसेंबर- जानेवारी महिन्यात जंगलांभोवती जाळरेषा (फायर प्रोटेक्शन लाइन) आखतात. अगदी महामार्गाच्या बाजूने तीन मीटर रुंदीतील गवत जाळून टाकले जाते. त्यामुळे यदाकदाचित आग लागलीच तरी ती रोखली जाते. जंगलातील वृक्षतोड रोखण्यासाठी ग्रामस्थांनी वाटेत मोठे खंदक खोदले आहेत. त्यामुळे कोणतेही मोठे वाहन जंगलात शिरूच शकत नाही. इतके करूनही कुणी जंगलतोड करताना आढळलाच, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. संबंधित ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये तसे ठराव संमत केले आहेत.   
उत्पन्नाचे स्रोत
आदिवासी विभागात कल्पवृक्ष मानल्या जाणारा मोह वृक्ष मुरबाड विभागात मोठय़ा प्रमाणात आढळून येतो. भांगवाडी ग्रामस्थांनी गेल्या आर्थिक वर्षांत सामूहिकरीत्या मोहाची फुले विकून ७९ हजार ९०० रुपये उत्पन्न मिळविले. त्यातून त्यांना सर्व खर्च वजा जाता सात हजार ४०० रुपये निव्वळ नफा मिळाला. मोहाच्या बियांपासून तेल काढण्यात आले. त्यातूनही २१०० रुपये नफा मिळाला. संयुक्त वन व्यवस्थापन योजनेतून भिरवाडी गावासाठी तेलाचा घाणा मिळाला आहे. वनसंवर्धनातून गावाला उत्पन्न मिळू लागले आहे. मोहामध्ये दूध व मनुकांच्या तुलनेत अधिक पोषक घटक आहेत. त्याच्या फुलांपासून मद्यनिर्मिती केली जाते. फळांची भाजी तर बियांपासून तेल काढले जाते. पेंढीपासून साबणनिर्मिती होते.    
प्रशांत मोरे