आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणजेच प्रत्येक सजीव हा पूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून असतो. आपल्या सर्व क्रिया, आनंद, समाधान, उत्कर्ष या आपल्याला वनस्पतींशिवाय करता येणे अशक्य आहे. म्हणजेच वनस्पतींनी माणसांचा पूर्ण विकास केला आहे व करत आहेत. आता प्रश्न असा आहे की, ज्यांनी आपल्याला जीवन दिले त्या वनस्पतींचे ऋण आपण कसे फेडणार?

श हरांमध्ये आज आपण निसर्गनियमांपासून पूर्णपणे दूर जाऊन आनंद, समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट एकसारखी एकएकटी पाहणे, अनुभवणे अशक्य असते. निसर्गातील घटक, जसे वनस्पती, पाणी, हवा, कचरा, आरोग्य, पर्यावरण या सर्वाचा एकात्मिक विचार करावा लागेल व त्यातून आपण शाश्वतता टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकू.
आज खरे म्हणजे शहर व ग्रामीण विभाग, प्रांत, देश असे काही राहिलेले नाही, असे आपण म्हणतो. जग हे एक ‘ग्लोबल व्हिलेज’ मानतो. तरीही प्रत्येक गाव, छोटी-मोठी शहरे, विभाग, प्रांत, देश यांच्या राहण्याच्या, आहाराच्या जीवनशैली तसेच संस्कृतीचे स्वत:चे असे वैशिष्टय़ आहे. हे वैशिष्टय़ त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, हवामान, उपलब्ध होणारे अन्न, फळे, जाती, जमाती यांच्याशी निगडित आहे. उदा. आपण ठाणे जिल्हा पाहू. यात असलेली छोटी-मोठी शहरे, यांच्या भोवतालची गावे, कल्याण, डोंबिवली, त्यांच्या भोवतालची गावे, जव्हार, मोखाडा व त्याचा परिसर वाडा, भिवंडी इ. परिसर यात नक्की स्वत:चे वेगळेपण आहे. हे वेगळेपण प्रादेशिक भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती यावर अवलंबून आहे. ही जी विविधता आहे त्यामध्येसुद्धा काही सूत्रे समान आहेत.
मानवाने आपला विकास करताना जीवन जास्त सुखी-समृद्ध व आनंदी होईल याची सातत्याने काळजी घेतली आहे. अनेक गोष्टी कालबाह्य़ झाल्या आहेत व अनेक नवीन स्वीकारल्या गेल्या आहेत. यातील काही अपरिहार्य आहेत. पण काही नक्की ठरवू शकतो. त्याप्रमाणे वैयक्तिक व सामाजिक नियम करणे आवश्यक आहे. हे करण्याचे काम त्या त्या विभागातील विचारवंत करतात. तसेच हे एकत्र येऊन त्या विभागाचे, प्रांताचे नीतिनियम ठरवत असतात. ही अत्यंत संथ प्रक्रिया आहे. पूर्वीही सातत्याने होत होती. काही काळ ती खंडीत झाली होती. आपण ती विसरलोसुद्धा होतो. दुसऱ्याचे पाहून आपण प्रभावित झालो होतो. माणसाला सातत्याने नावीन्याची आवड असते. तो सतत नवेनवे प्रयोग करत असतो व त्यामधून स्वत:ची जीवनशैली आहार, संस्कृती ठरवीत असतो. जे काही नवीन बदल केले, झाले ते त्या विभागानुसार योग्य न वाटल्यास परत जुन्याकडे आपण वळतो. जुने ते सोने ही म्हण आहेच. अर्थात सर्व जुने ते चांगले असा त्यात अर्थ नाही.
पूर्वजांनी अनेक वैज्ञानिक गोष्टी, परंपरा, संस्कृती, धर्म, रूढी यात बसविल्या. विज्ञान म्हणून समाजाने त्या स्वीकारल्या की नाही याबद्दल शंका आहे. पण धर्म, रूढी, परंपरा म्हणून आपण त्या स्वीकारतो. आता आपण बऱ्यापैकी वैज्ञानिक साक्षर झालो आहोत. या धर्म आणि रूढीत निर्माण झालेल्या अंधश्रद्धा व विज्ञान आपण ओळखू शकतो. त्यामधील अंधश्रद्धा काढून टाकून ज्या काही काळानुसार व विज्ञानानुसार योग्य असल्या तर स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदाने आरोग्याची जी व्याख्या केली आहे ती जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारलेली आहे. या व्याख्येत शरीर आरोग्य- मानसिक आरोग्य- सामाजिक- आध्यात्मिक आरोग्य असा त्याचा क्रम आहे. आज आपण फक्त शारीरिक आरोग्यातसुद्धा धडपडतच आहोत. हे सर्व आरोग्य आहार व विहार यामधून मिळते. या आहारात व विहारात निसर्ग आणि पर्यावरण यांचा मोठा वाटा आहे.
अन्न व पाणीपुरवठा परिसरातून बऱ्याच प्रमाणात होत असतो. शहरातील बऱ्याचशा गरजा आजुबाजूच्या गावांतून पूर्ण होत असतात. जसे दूध, भाजीपाला, पाणी इ. कामाला माणसे तर ग्रामीण भागाला शहरातून रोजगार पैसा, माहिती, तंत्रज्ञान अशा गोष्टींची पूर्तता होते. हे दोन्ही परस्परांवर अवलंबून असते. शहर व ग्रामीण भागातील लोकसमूह हे दोघे मिळून अनेक पर्यावरणीय समस्या कळत-नकळत निर्माण करत असतात. या समस्यांमुळे त्यांचे आरोग्य, विचार करण्याची क्षमता सातत्याने कमकुवत होत असते. या समस्यांमध्ये दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांमधून होणाऱ्या जाहिरातींच्या भाज्यांचा फार मोठा प्रभाव पडत असतो.
पूर्वजांनी मानवाची व पशूची व्याख्या केली आहे. पशू म्हणजे जो आहार, निद्रा, भय आणि मैथुन यातच जो आपले आयुष्य व्यतीत करतो तो. मानव म्हणजे त्यापलीकडे जाऊन जो सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करतो व त्यासाठी प्रयत्न करतो तो. आज आपल्यापैकी बरेचसे पशू अवस्थेत आहोत. मी, माझे कुटुंब, याबाहेर विचार करण्यास आपण नाखूश असतो, कृती तर लांबचीच. आपल्याला हक्काची जाणीव लगेच होत असते. त्यासाठी अनेक घटक काम करीत असतात; परंतु नाण्याची दुसरी बाजू कर्तव्य असते याचा आपल्याला विसर पडलेला आहे.
निसर्गातील एक नियम म्हणजे क्रिया झाली की तिची प्रतिक्रिया होत असते. आपण आपल्या समस्यांचा विचार करून त्यावर काय कृती करावी याची माहिती घेऊ. शक्यता अशी आहे. या समस्या आहेत याचीच अनेकांना जाणीव नाही. या समस्यांचा एकटा विचार करणे व त्यावर उत्तर शोधणे हे खरे म्हणजे समस्या वाढवणेच होते. समस्यांची तात्पुरती सोडवणूक न करता या समस्या का व कशामुळे निर्माण झाल्या आहेत त्यावर उत्तरे शोधून, त्यांचे निराकरण केल्यास परत तीच समस्या निर्माण होणार नाहीत.

Story img Loader