डोंबिवली पश्चिमेत सम्राट हॉटेल चौकातील श्री हर्ष प्लाझा सोसायटीची भुयारी जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही जागा वाहनतळासाठी असली तरी तिथे सध्या किराणा दुकान थाटण्यात आले आहे.
महापालिकेच्या जून २००८च्या स्थायी समिती सभेत स्वावलंबी सेवा महिला मंडळाच्या संचालिका सुप्रिया संजय चव्हाण यांना २५ वर्षांच्या कराराने ‘श्री हर्ष प्लाझा’मधील भुयारी वाहनतळ चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ही जागा वाहनतळाऐवजी पटेल आर मार्ट यांना किराणा दुकान चालवण्यासाठी भाडय़ाने दिले आहे. वाहनतळांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसताना आहे त्या जागेत किरणा दुकान चालवले जाते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या भागाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त, मालमत्ता विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
सोसायटीमधील वाहनतळाबाबत आपण पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एका बडय़ा राजकीय नेत्याचे आणि तत्कालीन पालिका पदाधिकाऱ्याचे या वाहनतळात हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे वाहनतळाच्या जागेत किरणा दुकान सुरू केल्याच्या तक्रारी पालिका अधिकाऱ्यांकडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही. या जागेत वाहनतळ सुरू आहे. पण जोड व्यवसाय म्हणून वाहनतळ चालवले जात असल्याचे या संस्थेकडून पालिकेला दाखवले जाते. अशी खोटी माहिती देऊन पालिकेचे आर्थिक नुकसान आणि वाहनचालक नागरिकांची गैरसोय केली जात आहे. पालिकेची फसवणूक केली म्हणून या संस्थेवर फौजदारी कारवाई करावी’ अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील सम्राट हॉटेल चौकातील श्री हर्ष प्लाझा सोसायटीत भुयारी जागेत हे वाहनतळ आहे. पश्चिम रेल्वे स्थानक भागात दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर ठेवण्यास जागा नाही. रेल्वेचे एकमेव वाहनतळ द्वारका हॉटेलसमोर आहे. देवीचापाडा, रेतीबंदर, उमेशनगर, मोठागाव, विजयनगर सोसायटी, महाराष्ट्रनगर, गरीबाचावाडा भागांतील वाहन चालक आपली वाहने या वाहनतळात ठेवू शकतात. वाहतूक विभागाने फुले रस्ता, गुप्ते रस्ता, दिनदयाळ, गांधी रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून देण्यास नकार दिल्यास आपोआप वाहन चालक सम्राट चौकातील वाहनतळावर वाहने ठेवण्यास सुरुवात करतील. त्यामुळे या ठिकाणी वाहनतळ असणे गरजेचे आहे, असे मत काही वाहन चालकांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा