ठाणे येथील बाळकुम परिसरातील पालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेल्या सुमारे पाचशेहून अधिक खाटांचे रुग्णालय प्रत्यक्षात उतरणार आहे. या रुग्णालयाचा फायदा ठाणे शहरच नव्हेतर जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.
बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड ठाणे महापालिकेला ‘टाऊन सेंटर’ या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला होता. ही जागा खासगी उद्योगांना भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. परंतु करोना काळात रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर या जागेत एक हजार खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आणि त्यानंतर ही जागा खासगी उद्योगांना भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव मागे पडला. ठाणे शहरातील कर्करोगाच्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जावे लागत असून प्रवासादरम्यान त्यांचे प्रचंड हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन या जागेत कर्करोग रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही होते. या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपाठोपाठ राज्य शासनाने मंजुरी दिली होती. यामुळे याठिकाणी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असली तरी हा प्रस्ताव कागदावरच होता. हा प्रस्ताव आता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहेत. रविवार, ३० जुलै रोजी या रुग्णालयाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आहे. या रुग्णालयाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले असून या रुग्णालयाच्या परिसरात त्रिमंदीर संकुलही उभारण्यात येणार आहे. या भुमीपुजन सोहळ्यास दादा भगवान फाऊंडेशनचे दिपक देसाई, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह मंत्री आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी करण्यासाठी ‘आरटीओ’कडून सेवा क्रमांक
बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलामधील ठाणे महापालिकेच्या टाऊन सेंटरच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. भूखंड जितो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल या संस्थांच्या माध्यमातून ठाणे महापालिका हे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी २४ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ आणि संलग्न असलेला १२ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड जितो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल या संस्थांना देण्यात आला आहे.