ठाणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव अंतर्गत उद्या सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा , महाविद्यालये, विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. देशात सर्वत्र “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
या अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम उद्या १७ ऑगस्ट रोजी राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात सर्वत्र उद्या सकाळी ११ ते ११.०१ या एका मिनिटाच्या कालावधीमध्ये नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे. तसेच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय, निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तर यात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग, सभागृह या ठिकाणी एकत्रित उपस्थित रहावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर राष्ट्रगीत गायनासाठी नगरपालिका आणि महानगरपालिका तसेच ग्राम स्तरावर सर्व प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेण्याचा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.