वाढत्या शहरीकरणामुळे आवाका वाढत चाललेल्या अंबरनाथ व बदलापूर शहरांमध्ये पाणी प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या १ लाख ७८ हजारांच्या जवळ तर अंबरनाथची २ लाख ५० हजार इतकी असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत येथे पाणी पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही शहरांसाठी उल्हास नदीतून ९० दशलक्ष लिटर्स, चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लिटर्स आणि एमआयडीसीतून ९ दशलक्ष लिटर्स पाणी उचलून पाणी पुरविण्यात येते.
जीवन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणानुसार बदलापूरला प्रतिदिन २८ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची बचत न झाल्याने व घरातील अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी जादा पाणी लागत असल्याने शहराला ४० दशलक्ष लिटर पाणी लागत आहे. अशीच परिस्थिती अंबरनाथची असून सर्वेक्षणाप्रमाणे त्यांना ३८ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून जादा वापर व बचत शून्य यांमुळे ५४ दशलक्ष लिटर्स पाणी प्राधिकरणाला पुरवावे लागत आहे. साहजिकच दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जुलैपर्यंत पाणीसाठा टिकवण्यासाठी दर सोमवारी अंबरनाथ व बदलापूरमध्ये पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून एकूण १४ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तसेच या दोन्ही शहरांमध्ये भुयारी गटार, काँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने दररोज पाण्याच्या पाइपलाइन फुटत असून पाणी पुरवठा खंडित होत आहे. गळती जी पूर्वी २० टक्के होती ती आता  ३० टक्क्यांच्या वर गेली आहे. नगर परिषदांच्या कामांमुळे हे नुकसान होत असूनही दोन्ही शहरांच्या नगर परिषदांचा त्यांच्याकडून तुटलेल्या पाइप लाइन जोडणीसाठी कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या आत्ताच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. |
संकेत सबनीस, अंबरनाथ

Story img Loader