कल्याण: शहापूर, मुरबाड तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी १० हून अधिक हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकही हमीभाव भात खरेदी केंद्र नव्हते. कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन चवरे सेवा सोसायटी आणि आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने कल्याण तालुक्यातील शासनाचे पहिले हमीभाव भात खरेदी केंद्र मामणोली येथे सुरू करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना या केंद्राचा शासन दराने भात विकणे सोयीचे होणार आहे. भात कापणीचा हंगाम झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी नवीन उत्पादित भाताला चांगला भाव मिळत असल्याने ते विक्री करतात. यापूर्वी हे भात शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना विकण्यात येत होते. हे व्यापारी शेतकऱ्यांना कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लुट करत होते. शासनाने शेतकऱ्यांच्या भाताला रास्त दराचा भाव मिळाला पाहिजे म्हणून शासनाने हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू केली. या माध्यमातून शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबली. चवरे शेतकरी सेवा सोसायटीच्या पुढाकाराने मामणोली येथील केंद्र सुरू झाले आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २६० एड्सचे रुग्ण

शहापूर, मुरबाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे १० हून अधिक भात खरेदी केंद्रे आहेत. कल्याण तालुक्यात अशाप्रकारचे केंद्र नसल्याने शेतकरी नाराज होते. आ. किसन कथोरे यांनी शासनस्तरावर याकामी पुढाकार घेऊन कल्याण तालुक्यातील मामणोली येथे हमीभाव भात खरेदी केंद्राला मंजुरी घेतली. या केंद्रावर कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी केली जाणार आहे. या भात खरेदी केंद्राचे उद्घाटन ठाणे जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आ. कथोरे, बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपील थळे, उपसभापती प्रकाश भोईर, माजी सभापती रवींद्र घोडविंदे, पंचायत समिती सभापती अस्मिता जाधव, जालिंदर पाटील उपस्थित होते.

हेही वाचा >>> स्टेट बँकेच्या नावाने कल्याणमधील नोकरदाराची सव्वा लाखाची फसवणूक

‘शेतकऱ्यांनी जमिनीला वाढीव भाव मिळतो म्हणून वडिलोपार्जित शेती विकून पाठीवर बिऱ्हाड घेण्याची वेळ येऊन देऊ नये. जमीन विकून शेतकरी बेदखल झाला तर सात बारा तुमच्या नावे राहणार नाही. सात बारा नाही तर भात विकण्याची वेळ येणार नाही. अशा चुकीच्या मार्गाने न जाता शेतकऱ्यांनी आपली वडिलोपार्जित शेती जपून ठेवावी. अलीकडे जमिनी विकण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. अशा स्पर्धेतून होणाऱ्या विकासाला अर्थ नाही’, असे आ. कथोरे यांनी सांगितले. सातबारा असेल तर अलीकडे शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे एक तरी सातबारा उतारा नावे ठेवा, असे आवाहन आ. कथोरे यांनी केले.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या सेवेत २३ बारवी प्रकल्प ग्रस्त रुजू; पाच तांत्रिक कारणामुळे प्रतीक्षा यादीत

शासन हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २७०० रुपये दर मिळणार आहे. यामध्ये दोन हजार ४० रुपये दर आणि ७०० रुपये सानुग्रह रकमेचा समावेश आहे. चवरे सेवा सोसायटीने हे केंद्र सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी आ. कथोरे यांनी दिलेले सहकार्य याबद्दल माजी सभापती घोडविंदे यांनी ग्रामस्थांच्यावतीने समाधान व्यक्त केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guaranteed price paddy procurement center at mamanoli for farmers of kalyan ambernath news ysh