पश्चिम रेल्वेकडून वसई-नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान संरक्षक भिंत

वसई आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान पश्चिमेकडील भागात रेल्वेने संरक्षक भिंत बांधली आहे. मात्र या भिंतीमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होऊन पुन्हा शहरात पूर स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिकेनेही याची गंभीर दखल घेतली असून रेल्वेला पाणी जाण्यासाठी या भिंतीच्या मधून मार्ग ठेवण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या वर्षी वसई विरार शहरामध्ये पूर आला होता. पुरामुळे येथील नागरी वस्तीसह इतर सर्वच भागांतील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच बरोबर रेल्वे वाहतुकीसह इतर वाहतूक सेवाही ठप्प झाल्या होत्या. दहा दिवस वसईतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते.

पूरस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी पालिकेने जानेवारी महिन्यांपासूनच सर्व नाल्यांची साफसफाई, नैसर्गिक नाल्याचे पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली होती. तसेच नालेसफाईच्या कामाबरोबरच  रेल्वेच्या भागात असलेले नाले बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडेही निधी देण्यात आला होता.

पालिकेच्या वतीने पूरस्थिती टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असताना पश्चिम रेल्वेने भिंत उभी करताना संभाव्य धोक्याचा विचार केलेला नव्हता. पश्चिम रेल्वेच्या वतीने नायगाव आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान सुमारे आठ फूट उंचीची भिंत बांधली आहे. मात्र ती उभी करताना पूर्व आणि पश्चिमेकडील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. शिवसेनेच्या मिलिंद चव्हाण यांनी मागील वर्षी खाडीवरील पुलाचा मुद्दा उचलून धरत आंदोलन केले होते.

त्यानंतर पालिकेने पूल तोडल्यानंतर शहरातील पुराच्या  पाण्याचा निचरा झाला होता. मागील वर्षी पूर नायगाव खाडीवर बांधलेल्या बेकायदा पुलामुळे आला होता. या वेळी भिंत बांधण्यात आली आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

याबाबत आम्ही पालिकेला निवेदन देणार आहोत, असे ते म्हणाले. पाणी रुळावरून जात नसले तरी भिंतीसाठी खाली पाया खणला जातो. त्यामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. या रेल्वेच्या जवळच्या परिसरात मोठय़ा संख्येने नागरी वस्ती आहे. जर पाणी जाण्यासाठी मार्गच नसेल दोन्ही बाजूचे पाणी एकाच ठिकाणी साचून राहील याचा मोठा धोका हा येथील नागरीवस्तीला बसू शकतो असे त्यांनी सांगितले.

पुराचे पाणी रूळांवरून जात नाही. मात्र या भिंतीमधून पाणी जाण्याचे मार्ग ठेवावेत अशा सूचना पश्चिम रेल्वेला करम्ण्यात येतील.    -राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार महापालिका

Story img Loader