ठाणे – ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणातील पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच सध्या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असला तरी त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. अशा स्पष्ट सूचना आणि आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन आणि पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राज्यातील अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्याला प्रामुख्याने एमआयडीसीचे बारवी धरण आणि टाटा कंपनीच्या आंद्रा धरणातून दररोज २ हजार दश लक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मागील महिन्यात झालेल्या मुबलक पावसामुळे बारवी धरण शंभर टक्के भरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर आंद्रा धरणात ८६ टक्के पाणी आहे. भातसा धरण ९४ टक्के भरले आहे. या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात २०० दश लक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. सद्यस्थितीत जिल्ह्यात मुबलक पाणी साठा असून तो मे अखेर पर्यंत पुरणार आहे. मात्र पाऊस अपुरा झाल्याने या पाणी साठ्याबाबत दोन महिन्यांनी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. असे पाट बंधारे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणातील पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच सध्या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असला तरी त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. अशा स्पष्ट सूचना आणि आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन आणि पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister shambhuraj desai instruction to the district administration regarding the use of water in reservoirs amy