ठाणे – बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची सविस्तर चौकशी केली जाईल. तर शाळेच्या संस्थेशी निगडित असलेल्या सर्वांची आणि गुन्हा दाखल करून घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल संबंधितांची तात्काळ चौकशी करावी असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला दिले. तर या चौकशीचे दोन दिवसात अहवाल सादर करण्यात यावे असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध मागील दोन ते तीन दिवसांपासून बदलापूर वासियांनी आंदोलन सुरू केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी शनिवारी, रविवारी मोर्चा देखील काढला होता. मात्र इतकी मोठी घटना होऊन सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही अथवा स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्याशी संवाद साधून कोणतेही आदेश अथवा कारवाईच्या सूचना केल्या नाहीत. तर मंगळवारी बदलापूर वासियांच्या या विरोधाचा उद्रेक झाला आणि त्याचे काही ठिकाणी हिंसेत देखील रुपांतर झाले. मात्र इतकी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी भेट देण्याचे तर दूरच मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अथवा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दुपार पर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा >>>अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांना हटवले, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा
तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवित असलेल्या शंभूराज देसाई यांनी यातील कोणतीही तसदी घेतली नाही. तर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या अत्याचाराची सविस्तर चौकशी केली जाईल. तर शाळेच्या संस्थेशी निगडित असलेल्या सर्वांची आणि गुन्हा दाखल करून घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल संबंधितांची तात्काळ चौकशी करावी असे आदेश जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला दिले. तर या चौकशीचे दोन दिवसात अहवाल सादर करण्यात यावे असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले. तर संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभुराज देसाई यांनी अगदी सायंकाळी आदेश दिल्याने नागरिकांना कडून त्यांच्या विरूध्द रोष व्यक्त करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्रीच निष्ठुर आणि बेफिकीर असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.