ठाणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई रुग्णालयात येणार आहे.
द्वारली येथे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या बांधकाम कंपनीच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी एकनाथ नामदेव जाधव यांच्याकडून महार वतनाची सव्वा एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा विकास करारनामा करण्यासाठी एकनाथ जाधव सर्व व्यवहार पूर्ण होऊनही टाळाटाळ करत होते. शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यामुळे हा व्यवहार पूर्ण करत नसल्याचे गणपत गायकवाड यांचे म्हणणे होते. जमिनीच्या वादाविषयी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव त्यांच्या साथीदारांसह महेश गायकवाड, चैनू, राहुल यांच्या विरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले होते. त्यांच्या पाठोपाठ महेश आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. त्यामुळे वाद उफाळून आला होता. त्यानंतर गणपत गायकवाड हिललाईन पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयातच महेश आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला.
हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढतेय; आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप
हेही वाचा – आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बाॅम्ब शोधक पथक
महेश यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरिरातून गोळ्या काढण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश यांच्या प्रकृतीविषयी डाॅक्टरांकडे विचारपूस केली होती. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हेदेखील ज्युपिटर रुग्णालयात येणार आहेत. ज्युपिटर रुग्णालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.