गेल्या अनेक महिन्यांपासून वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत विविध संघटनांकडून तक्रारी अर्ज करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्याकडेही यासंबंधीच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासन या तक्रारींकडे लक्ष देत नसल्याने श्रमजीवी संघटनेतर्फे पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या निवासस्थानी मृत आरोग्य व्यवस्थेची प्रेतयात्रा काढण्यात आली.  
गेले काही महिने वाडा ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ एकही डॉक्टर नसल्याने येथील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या ठिकाणी वाडा, विक्रमगड या तालुक्यांतून तसेच अघई(शहापूर), खोडाळा(मोखाडा) या परिसरातून दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सुविधांअभावी खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे.
या समस्यांबाबत वारंवार अर्ज विनंत्या करून दखल घेतली जात नसल्याने वाडा तालुका श्रमजीवी संघटनेने येथील पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या निवासस्थानी आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा मध्यंतरी दिला होता. त्यानुसार संघटनेच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी सावरा यांच्या निवासस्थानी धडक दिली.

Story img Loader