डोंबिवली, ठाण्यात यावेळी गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. करोना व्हायरसच्या दहशतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली आणि ठाणे येथील सगळ्या शोभायात्रा करोनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. २२ वर्षांची परंपरा यामुळे खंडीत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्याही सगळ्या स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतयात्रा संयोजकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी या शोभायात्रा रद्द केल्याची माहिती दिली.
२२ वर्षांपासून डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. मात्र करोनाच्या दहशतीमुळे यावर्षी शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १७ झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन करण्यात येतं आहे. तसंच मॉल, नाट्यगृहं या ठिकाणीही जाऊ नका असंही सांगण्यात येतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असं म्हटलं आहे. अशात गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचं? यासंबंधी शोभायात्रा संयोजकांची बैठक पार पडली. या बैठकीत या वर्षी शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.