नव्या भारतीय वर्षांत दोनदा गुढी पाडवा येणार असल्याची माहिती पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
शुक्रवार ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नवीन वर्षांत वर्षांरंभी आणि वर्ष अखेरीस असे दोन गुढी पाडवा असणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, यावर्षी शुक्रवार ८ एप्रिल रोजी गुढीपाडवा आला आहे. पुढील वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी असल्याने मंगळवार २८ मार्च २०१७ रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी फाल्गुन अमावास्या संपल्यावर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. त्यामुळे ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन पंचांगात दोन गुढीपाडवा देण्यात आले आहेत.
नव्या शालिवाहन शकवर्षांत १४ फेब्रुवारी २०१७ रोजी एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. सुवर्ण खरेदीसाठी गुरुपुष्य योग मात्र सहा येत आहेत.
नूतन वर्षी सोमवारी ९ मे रोजी सायंकाली ४-४१ पासून सूर्यास्तापर्यंत बुध ग्रहाचे अधिक्रमण भारतातून दिसणार आहे. नूतन शालिवाहन शक वर्षांत एकूण पाच ग्रहणे होणार असून १६ सप्टेंबर २०१६चे छायाकल्प चंद्रग्रहण, १० फेब्रुनारी २०१७ चे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.
पंचांगाचा शतकोत्तर अमृत महोत्सव
या वर्षी छापील पंचांगाचा शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पूर्वी छपाईची कला उपलब्ध नसल्याने पंचांगे ही हस्तलिखित तयार करून त्यातील माहिती तोंडीच सर्वाना दिली जात असे. पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यानी शिलाप्रेसवर छापून प्रसिध्द केले. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वहस्ताक्षरात लिहिले होते. त्या पहिल्या छापील पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुळे यांनी केले होते. या निमित्त ‘पंचांग’ या विषयावर ७५ व्याख्याने देणार असल्याचे त्यांनी सांगितले.