करोना महासाथीमुळे दोन वर्षाच्या खंडानंतर श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष पालखी सोहळ्यात डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी आनंदोत्सवाने सहभागी झाले होते. टाळेबंदीमुळे दोन वर्षाचा रहिवाशांच्या मनात दबलेला उत्साह रस्त्यावर पालखी सोहळ्यात ओसंडून वाहत होता. शासनाने निर्बंधमुक्त महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर तर उत्साहाला भरते आले आणि बालगोपाळ, तरूण, ज्येष्ठ, वृद्ध, दिव्यांगांनी पालखी सोहळ्यात हर्षोल्हासात सहभागी होऊन करोनाचे आसमंतात दाटलेले मळभ आणि लाटेचे इशारे दूर सारले.
मागील दोन वर्ष दिवाळी, नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त गर्दी नसल्याने दुर्मुखलेला फडके रोड शनिवारी गर्दी, आनंदाने ओसंडून वाहत होता.
चैत्रपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेचे दिवस जवळ आले तरी शासनाकडून करोना साथीचे निर्बंध हटविण्यात येत नव्हते. स्वागत यात्रा संयोजकांमध्ये अस्वस्थता होती. अशा परिस्थितीत डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने निर्बंध पाळत कोणत्याही परिस्थितीत पालखी सोहळा काढण्याचा निर्णय घेतला. डोंबिवलीतील रहिवासी, संस्था, संघटनांनी त्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. अवघ्या दहा दिवसात मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याची तयारी करण्यात आली.
हिंदू नववर्ष पालखी सोहळ्या निमित्त श्री गणेश मंदिरात शनिवारी पहाटे गणपतीला अभिषेक, मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम अध्यक्ष राहुल दामले यांच्या हस्ते झाला. मागील दोन वर्षात विकारी, प्लवनाम शालिवाहन सवंत्सरात विश्वाला महासाथीच्या माध्यमातून मोठे तडाखे बसले. जग आता कोठे या साथीमधून सावरत असताना शुभकृत सवंत्सराचा प्रारंभ झाला आहे. येणारा काळ देश, राज्य, शहर, गाव पातळीवरील प्रत्येकाला आनंददायी, आरोग्यसंपन्न दे, येऊन गेलेल्या अरिष्टातून प्रत्येकाला बाहेर काढ, अशी प्रार्थना श्री गणेशाला मंदिर संस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आली.
डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील नाख्ये समुहाच्या मारूती मंदिरातून पालखी सोहळ्याला गुढी उभारून प्रारंभ करण्यात आला. यावेळी करोना महासाथीमध्ये आरोग्य, वैद्यकीय, सामाजिक सेवा कार्यात योगदान दिलेल्या डॉक्टर, परिचारिका, करोनाने मृत रुग्णांच्या पार्थिंवांवर अंत्यसंस्कार करणारे, स्मशानभूमीत रात्रंदिवस दहनासाठी सेवा देणारे, शहर स्वच्छ ठेवणारे सफाई कामगार, रूग्णवाहिका चालक यांचा प्रातिनिधिक सत्कार संस्थानतर्फे करण्यात आला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रमोद पाटील, माजी नगरसेवक मंदार हळबे व्यासपीठावर उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात इंधन बचत, पर्यावरण संवर्धन, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या संस्था कार्यकर्ते हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. पालखीच्या अग्रभागी ध्वज पथक, दुचाकी स्वारांचा ताफा होता. तरूण, तरूणी वाहनांचे सारथ्य करत होते. डोंबिवली सायकल संघटनेचे सदस्य इंधन बचतीचा संदेश देत होते. नववारी साडी ल्यालेल्या, कमरपट्टा, दंड, नथ, कर्णफुले असे दागिने परिधान केलेल्या, पारंपारिक वेशभूषेतील तरुणी, महिला सोहळ्यात सहभागी होत्या. पारंपारिक वेषात तरूण सहभागी झाले होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर दिसणारी तरूणाईची सळसळ चैत्रपाडव्याच्या दिवशी दिसत होती. गटागटाने आपल्या मित्रमैत्रिणींच्या मोबाईलमधून छब्या काढण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. गणेश मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
संस्कार भारतीची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची आझादीची रांगोळी, फडके रस्त्यावरील स्वागत यात्रेच्या देखण्या रांगोळ्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. पालखी सोहळ्यात अचानक काही वेळ अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदिनाथ कोठारे सहभागी झाले. त्यांनी ढोलताशाच्या वादनावर ठेका धरल्यावर तरुणाईने जल्लोष झाला.
फडके रोड ते शिवाजी पुतळ्या दरम्यान सात ढोलताशा पथके अंतराने वादन करत होती. पथकांची नृत्य, वादन पाहण्यासाठी रहिवाशांनी गर्दी केली होती. सोहळ्यानिमित्त रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात आले होते. वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याने दोन वर्षानंतर मानपाडा रोड, फडके रोड पालखी सोहळ्यानिमित्त मोकळेपणाचा आनंद लुटत होते.