करोना प्रतिबंधाचे निर्बंध कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत प्रशासनाने कायम ठेवल्याने चैत्र पाडव्याच्या दिवशी कल्याण-डोंबिवली शहरात काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय उत्सव समित्यांनी घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेली ५० टक्के उपस्थितीची अट आणि पोलिसांच्या जमावबंदीचा आदेशामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत, असे उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आणि कल्याणमध्ये कल्याण संस्कृती मंचतर्फे मागील अनेक वर्षापासून चैत्र पाडव्याच्या दिवशी शहरात नववर्ष स्वागत यात्रा काढल्या जातात. अनेक वर्षांची ही परंपरा करोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्षापासून खंडित झाली आहे. यावर्षी कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णांची संख्या घटली आहे. ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या अनेक भागातील करोना प्रतिबंधाचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून शून्यावर आली आहे. पालिका हद्दीतील प्रतिबंधीत निर्बंध उठवले जातील, असा अंदाज उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना होता. परंतु निर्बंध उठवण्यासाठी शहरातील रहिवाशांचे ९० टक्के लसीकरण बंधनकारक आहे. हे लक्ष्य कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत पूर्ण झालेले नसल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले निर्बंध कायम राहणार आहेत.

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले, पालिका, शासकीय नियमांच्या चौकटीत राहून गणेश मंदिरातील धार्मिक कार्यक्रम केले जाणार आहेत. गेली दोन वर्ष करोना महासाथीमुळे लोक घरात बंदिस्त आहेत. त्यांना उत्सवी वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी गणेश मंदिरात याग, पठाण, प्रवचन. असे कार्यक्रम केले जाणार आहेत. करोना प्रतिबंधाचाचे नियम पाळून कार्यक्रम केले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम होणार नाहीत, असे ते म्हणाले.

कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष निशीकांत बुधकर यांनी सांगितले, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत करोना प्रतिबंधाचे निर्बंध कायम आहेत. पोलिसांचे जमावबंदीचा आदेश आहेत. शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa shobha yatra canceled in kalyan dombivali due to non fulfillment of vaccination rules asj