उल्हासनगर : एका खासगी समारंभात वेटरने रेड बुल नावाचे पेय पिण्यासाठी न दिल्याचा राग येऊन एका पाहुण्या व्यक्तीने सबंधित वेटरला काचेचा ग्लास मारून फेकत मारहाण केली. या मारहाणीत त्या वेटरचा दात पडला आहे. याप्रकरणी पाहुण्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील एका नामांकित सभागृहात २५ जानेवारी रोजी एक साखरपुडा समारंभ सुरू होता. या समारंभात एका व्यक्तीला वेटरने रेड बुल नावाचे पेय पिण्यासाठी दिले नाही. त्याचा मनात राग धरून त्या व्यक्तीने तिथे काम करत असलेल्या एका वेटरला शिवीगाळ करत त्याने त्याच्या हातातील काचेचा ग्लास तोंडावर फेकून मारला.
काचेचा ग्लास लागल्याने वेटर चक्कर येउन खाली पडले. त्यावेळी त्याला मारहाण सुद्धा केली गेली. त्यामुळे वेटरच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. तर याच मारहाणीत वेटरचा एक दात पडला. सोबतच त्याचे गुडघ्याचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी वेटर नरेंद्र शेठी यांच्या तक्रारीवरून विशाल अशोक मेळवानी यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.