डोंबिवली : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू गिटार वादक आणि ॲक्युपंक्चर थेरपिस्ट किरण फाळके यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने येथे निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. डोंबिवलीतील पुस्तक अदान प्रदान कार्यक्रमात शुक्रवारी किरण फाळके यांचा उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. शिव मंदिर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

60 वर्षांपासून किरण फाळके यांचे डोंबिवलीत वास्तव्य होते. डोंबिवली शहरात घडलेली स्थित्यंतरं त्यांनी जवळून अनुभवली होती. ॲक्युपंक्चर शास्त्राचा त्यांना अनुभव होता. 35 वर्षे ते गरजूंना मोफत उपचार देत होते. नुकतीच त्यांची भिवंडी येथील एका महाविद्यालयात मार्गदर्शक म्हणून म्हणून नियुक्ती झाली होती. या क्षेत्रात अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले.

हेही वाचा…Video : खाडी पुलांच्या दुभाजकाचा भाग कोसळला; मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव उड्डाण पुलावरील घटना

गिटार वाजवत गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन करणे हा त्यांचा छंद होता. वाद्य वाजविण्यात ते निपुण होते. की बोर्ड, साऊथ अर्बन, गिटार, हवाईयन गिटार यांसारखी 5 ते 6 वाद्य त्यांना वादन करता येत होती. अलीकडे डिजिटल ऑडियो रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांनी दोन ध्वनिमुद्रिका तयार केल्या होत्या. आपल्या मोटार सायकल वरून त्यांनी डोंबिवली ते कन्याकुमारी आणि पाकिस्तान सरहद्दपर्यंत भारत भ्रमण केले होते. त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guitarist and acupuncturist kiran phalke grandson of dadasaheb phalke passed away on saturday sud 02