कल्याण – गुजरात, वापी येथून चोरट्या मार्गाने आणलेला ३० लाख रुपयांचा प्रतिबंंधित गुटख्याचा साठा कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे गुरुवारी दुपारी खडकपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुजरातमधील गुटखा घेऊन येणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी विनोद गंगवाणी याचा पोलीस शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद राजा मोनीस पठाण (२६) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील वापी भागात डोंगरी फरीया येथे स्पीन पार्क इमारतीत राहतो. खडकपाडा पोलीस ठाण्यातील हवालदार नामदेव व्हटकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद, फरार आरोपी विनोद गंगवाणी याच्या विरुद्ध मानवी जीवनास हानीकारक होईल अशा प्रतिबंधित गुटख्याची विक्री, अन्न आणि औषध प्रशासन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील ४२ बालवाड्यांना निकृष्ट खेळण्यांचा पुरवठा; शिक्षिकांच्या तक्रारी

पोलिसांनी सांगितले, गुरुवारी दुपारी खडकपाडा पोलीस कल्याणमधील दुर्गाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुर्गाडी किल्ला येथून एक ट्रकचालक भरधाव वेगात संशयास्पदरित्या ट्रक चालवित असल्याचे आढळले. पोलिसांनी पाठलाग करून मोहम्मद याचा ट्रक रोखून धरला. त्याला ट्रकमध्ये काय आहे याची माहिती विचारली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. ट्रकमध्ये काय आहे याची माहिती चालक देत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांंनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून मोहम्मद याच्या ट्रकची तपासणी केली. ट्रकमधील प्रतिबंधित गुटख्याचा साठा पाहून पोलीस अचंबित झाले.

१० गोण्यांमध्ये विमल पान मसाला, एक पाकिटाची किंमत १९८ रुपये. विमल पान मसाल्याचा एकूण १४ लाखांचा साठा आढळला. तंंबाखू जर्दाच्या दीड लाख किमतीच्या ३० गोणी, लहान विमल दर्जा गुटखा एकूण ५०० पाकिटे असा एकूण ट्रकसह ३० लाखांचा गुटख्याचा साठा खडकपाडा पोलिसांंनी जप्त केला.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या मुंबईतील स्मारकाप्रमाणेच आनंद दिघेंचे ठाण्यातील महापौर निवासात स्मारक

हा गुटखा उल्हासनगर परिसरात नेऊन तेथून त्याची घाऊक पद्धतीने विक्री करण्याचा तस्करांचा उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. फरार आरोपी विनोद गंंगवाणी याच्या अटकेनंतर खरी माहिती उघड होईल असे पोलिसांंनी सांगितले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. ए. शिवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी परिसरातील पानटपऱ्यांवर अलीकडे अधिक प्रमाणत प्रतिबंधित गुटखा चोरून विकला जात असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. युवा वर्ग प्रतिबंधित गुटखा खाण्याकडे अधिक वळला असल्याच्या तक्रारी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat connection of gutkha in kalyan 30 lakh stock seized near durgadi ssb