ठाणे : शहरातील रस्ते सफाई कामाचा दर्जा वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेने दोन महिन्यांपुर्वी घेतलेल्या दोन यंत्र वाहनांपैकी एका वाहनांची नोंदणी गुजरात राज्यातील असल्याची बाब पुढे आली आहे. शहरातील रस्ते सफाईसाठी थेट गुजरातवरून यंत्र वाहन आणण्यात आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. यानिमित्ताने शहरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या गाड्या गुजरातवरून…थोड्या काळाने महाराष्ट्र गुजरातच चालवणार का, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी समाजमाध्यमांद्वारे पालिकेवर टिका करण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची मानवी पद्धतीने सफाई करण्यात येते. अनेक रस्त्यांची योग्यप्रकारे सफाई होत नसून यासंबंधीच्या तक्रारी पालिकेकडे सातत्याने येत होत्या. हि बाब शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान निदर्शनास येताच ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठेकेदारांना रस्ते सफाईच्या कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले होते. परंतु वारंवार सुचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे त्यांनी काही ठेकेदारांना नोटीसा बजावल्या होत्या. तरीही कामात काहीच सुधारणा होताना दिसून येत नव्हती.
अखेर यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करण्याचा निर्णय आयुक्त बांगर यांनी घेतला होता. त्यानुसार ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी एकूण सहा सफाई यंत्र वाहने घेण्यात येणार असून त्यापैकी दोन वाहने पालिकेच्या ताफ्यात दोन महिन्यांपुर्वी दाखल झाली आहेत. भाडे तत्वावर ही वाहने पालिकेने घेतली आहेत. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम ही वाहने करतात. ठाणे शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई या यंत्र वाहनाद्वारे करण्यात येत आहे. दोनपैकी एक वाहनाची नोंदणी महाराष्ट्र राज्यातील आहे तर, दुसऱ्या वाहनाची नोंदणी गुजरात राज्यातील आहे.
हेही वाचा >>> ‘ओम नम शिवाय’ बोलण्यास सांगून डोंबिवलीत वृध्दाला लुटले
शहरातील रस्ते सफाईसाठी थेट गुजरातवरून यंत्र वाहन आणण्यात आले असून हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. समाजमाध्यमांवर या वाहनाचे छायाचित्र आणि त्यासोबत पालिकेच्या कारभारावर टिका करणारा मजकूर प्रसारित झाला आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या गाड्या गुजरातवरून…थोड्या काळाने महाराष्ट्र गुजरातच चालवणार का, असा प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठी माणसा जागा हो असे आवाहनही करण्यात आले आहे. या वाहनामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
ठाणे शहरातील रस्ते सफाईसाठी महापालिकेने दोन यंत्र वाहने भाडे तत्वावर घेतली आहेत. या वाहनांसाठी वर्षाकाठी पालिका १ कोटी ३८ लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदार गुजरात राज्यातील आहे. त्यांनी घेतलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचे चेसीज हे गुजरात राज्यात नोंदणी असून यंत्र मात्र पुण्यात बसविण्यात आले आहे. दुसरे वाहन मात्र महाराष्ट्रात नोदणी झालेले आहे. गुजरात नोंदणीत असलेले वाहन बदलून महाराष्ट्र नोंदणी असलेले वाहन आणावे असा सुचना ठेकेदारास देण्यात आल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सुत्रांनी दिली.
ठाणे शहरातील रस्ते सफाईसाठी कंत्राटदारामार्फत भाडे तत्वावर दोन यंत्र वाहने घेण्यात आली आहेत. हि वाहने कंत्राटदाराची आहेत. पालिकेने ही वाहने खरेदी केलेली नाहीत. – तुषार पवार उपायुक्त, ठाणे महापालिका