गुजराथीनगर,  शहापूर, जिल्हा ठाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसेंदिवस महामुंबईचे क्षेत्र विस्तारत आहे. बदलापूरनंतर आता कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी किफातशीर किमतीतील घरांसाठी शहापूरचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. १५ वर्षांपूर्वी  ‘गुजराथीनगर’ने येथील शहरीकरणाचा पाया रचला.

ठाणे जिल्ह्य़ातील सर्वात मोठा तालुका म्हणून शहापूर ओळखला जातो. अलीकडेच शहापूर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. मात्र स्थानिक प्रशासन व्यवस्था बदलूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. तरीही कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी   किफायतशीर किमतीतील  भविष्यातील गुंतवणूक म्हणून येथील गृहप्रकल्पांमध्ये घरे घेत आहेत. गुजराथीनगर ही अशीच एक वसाहत आहे.

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर शहापूर येथे गुजराथीनगर ही नवी वसाहत १५ वर्षांपूवी वसली आहे. तळ अधिक दोन मजल्यांच्या पाच इमारती येथे उभारल्या गेल्या आहेत. एखादा कार्यक्रम घेतल्यास हजारोंची आसनव्यवस्था होऊ शकेल इतकी भरपूर मोकळी जागा येथे आहे. वसाहतीत ८० कुटुंबे राहतात.

शेती उद्योग

गुजराथी नावाच्या व्यक्तीने १० ते १२ एकर जागेत हे मोठे गृहसंकुल बांधले. पूर्वी ते या जागेत शेती करीत होते. ३५ वर्षांपूर्वी त्यांनी या जागेत ऊस पिकविला होता. जोडीला टोमॅटो आणि हरभऱ्याचे उत्पादनही घेतले आहे. त्यांच्या जागेलगत भारंगी नदी वाहत असल्याने त्यांना पाण्याची कमतरता नव्हती.  येथील अनेक कुटुंबे शेतीवर अवलंबून असल्याची माहिती संतोष तावडे यांनी दिली.

 तीन पिढय़ांची चाळ

गुजराथीनगर परिसरात प्रवेश करताच सुमारे ७० वर्षांपूर्वीची तळ अधिक दोनमजली चाळ दृष्टीस पडते. दहा वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून ती जाहीर झाली आहे.   या गुजराथीनगर चाळीने तीन पिढय़ांना  आधार दिला. ही चाळ त्या वेळच्या चिवट अशा चुना आणि गूळ आदी साहित्यांच्या मिश्रणातून उभारली गेली आहे. वयोमानामुळे आज जरी चाळीला भेगा पडल्या असल्या तरी ती मजबूत आहे.    ४० कुटुंबे येथे राहत होती. चाळ धोकादायक झाल्याने बहुतांश कुटुंबे ही सुखवस्तीसाठी इतर भागांत गेली, तर काही या गुजराथीनगरमध्ये उभारलेल्या नव्या इमारतींमध्ये सामावून गेली आहेत. चाळीमार्फत १९६० मध्ये सुरू झालेला सार्वजनिक माघी गणेशोत्सव मित्र मंडळ आजही कार्यरत आहे. या मंडळामार्फत माघी गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होत असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, एकांकिका, वेशभूषा स्पर्धा, गायन, होळी तसेच दहीहंडी उत्सवाची ५० वर्षांची परंपरा आहे. अनाथ मुलांना गरजेच्या वस्तूंचे वाटप, वैद्यकीय शिबीर असे सामाजिक उपक्रमही पार पडतात. भरपूर मोकळी जागा असल्याने कार्यक्रम पाहण्यासाठी शहापूरवासीयांची मोठी गर्दी होते, असे तावडे यांनी सांगितले.    संकुलात वाहनतळासाठी मोठी जागा आहे. ताडोबा मंदिराभोवती असलेले उद्यान, पिंपळ, अशोक, वड, लक्ष्मीतरू, उंबर आदी निसर्गसौंदर्याने बहरणारी वृक्षवल्लीमुळे येथे शांत आणि प्रसन्न वाटते.

शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, करमणुकीचे कोणतेही साधन नाही. एक सिनेमागृह बांधण्यात येणार होते. मात्र पुढे तो प्रकल्प रखडला.   सरकारी रुग्णालये आहेत. तिथे सुविधांचा अभाव आहे.  शेजारीच नाशिक-मुंबई महामार्ग, काही शैक्षणिक सुविधा उत्तम असल्या तरी प्राथमिक गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत येथील रहिवाशी नारायण शेट्टी व्यक्त करतात.

‘ताडोबा’चे मंदिर

गुजराथीनगरमध्ये ताडोबा मंदिर आहे. येथे नियमितपणे कीर्तन, भजन, भंडारा, महाप्रसाद अनेक धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडतात. जमीनमालक बाबाशेठ गुजराथी यांनी ३९ वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.  कालांतराने मालक गुजराथी यांनी या छोटय़ाशा मंदिराची संगमरवरीत भव्य उभारणी केली. मालक श्री अंबेमातेचेही भक्त असल्याने या मंदिरात देवीचीही प्रतिष्ठापना केली. आज देवीचा नवरात्रोत्सव आणि ताडोबाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असतो.

सुहास धुरी suhas.dhuri@expressindia.com