ठाणे : पारंपरिक फळशेतीच्या पुढे जात जिल्ह्यातील विविध शेतकरी आता नवीन प्रयोग करू लागले आहेत. याचेच फलित म्हणून त्यांच्या विविध पिकांच्या उत्पादनात वाढ होत असून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू लागला आहे. याच पद्धतीने शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात गुलाब दिनकर या आंबा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मदतीने फळांची साठवण, पॅकिंग साठी पॅक हाऊस बांधून घेतले. या पॅकहाऊसच्या माध्यमातून अधिक काळ फळांची साठवणूक होऊ लागली तसेच फळाचे खराब होण्याचे प्रमाण देखील कमी झाले. यामुळे फळांच्या विक्रीतून त्यांचे अधिक अर्थार्जन होत आहे.
शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील शेतकरी गुलाब दिनकर यांनी कृषी विभागामार्फत रोहयो अंतर्गत १९९५-९६ साली हापूस, केशर व चिकू कलमांची लागवड केली होती. त्यात आंबा कलमे १५०व चिकू कलमे ५० अशा पद्धतीने २ हे. क्षेत्रावर लागवड झाली. कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित संगोपन करून पाच ते सहा वर्षाच्या कालावधीत आंबा झाडांना उत्पादन चालू झाले. आज नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेशी जवळीक साधली जात आहे. त्याचाच फायदा म्हणून त्यांना मिळणाऱ्या उत्पादनाची बाजारपेठेत मागणी येऊ लागली. परंतु उत्पादित मालाची साठवणूक व प्रतवारी करता येत नसल्याने उत्पादित माल खराब होऊन नुकसानीचे प्रमाण जास्त होते. येणाऱ्या उत्पादनाची हेळसांड व नुकसान कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पहिले. या नुकसानीतून सुटका करण्यासाठी व उत्पन्नात वाढ होण्यासाठी त्यांनी दिनकर यांना पॅक हाउस बांधणीचे सुचविले व त्याच दृष्टिकोनातून ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करून घेतला.
पॅक हाऊस बांधणीसाठी शेतकरी गुलाब दिनकर यांना सुमारे ४ लाख ६६७ हजार इतका खर्च आला व त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून २ लाखांचे अनुदान मिळाले. त्यानंतर या पॅक हाऊस मुळे उत्पादित मालाची साठवण करणे सोपे झाले. शिवाय काढलेल्या मालाचे शून्य उर्जाधारीत शीतकक्षामुळे मालाची गुणवत्ता वाढली. तसेच उत्पादित मालाची आवश्यकतेनुसार स्वच्छता व प्रतवारी करणे सोपे झाले. उत्पादनाचे मूळ रूपात बदल न करता काढणीपश्चात पॅकिंग व फिलिंग यासाठी लागणारे यंत्र सामग्रीमुळे मालाची टिकवण क्षमता वाढली. कच्चा माल तयार होण्यासाठी साठवणूक सुविधा, हाताळण्यासाठी ट्रॉली, कॅरेट्स मिळाल्यामुळे मालाची गुणवत्ता राखली गेल्यामुळे आंबा पिकाला बाजारपेठेत हवा तसा दर मिळू लागला. यामुळे गतवर्षी दिनकर यांना सुमारे १.५ लाखांहून अधिकचा नफा झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही शेती करण्याला प्राधान्य द्यावे, असे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पॅक हाऊस म्हणजे काय ?
पॅक हाऊस हे शेतीतील प्रामुख्याने फळपिके, भाजीपिके इत्यादींची साठवणूक करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात. या ठिकाणी अंतर्गत भागात दोन चौकन असलेले विटांचे हौद बांधण्यात येतात. या हौदात फळांचे कॅरेट ठेऊन हौदाच्या बाहेरील चौकोनात वाळू टाकून त्यात पाणी टाकण्यात येते. यामुळे थंडावा निर्माण होऊन फळे खराब होत नाही. तसेच इतर उर्वरित जागेत फळांची पॅकिंग करणे ही सोपे जाते. यामुळे स्वच्छता ही राखली जाते आणि पिकाची नासाडी देखील होत नाही.
उत्पादित माल खराब होणे, मालावर डाग पडणे व गुणवत्ता ढासळण्यासारख्या गोष्टींपासून पॅक हाऊसमुळे सुटका झाली. या सर्व बाबींमध्ये फरक पडल्याने मागील वर्षी मला मिळालेल्या उत्पन्नात जवळजवळ दुपटीने वाढ झाली. यंदाही याच पद्धतीने प्रक्रिया सुरु आहे. यासाठी मार्गदशन करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार. गुलाब दिनकर, शेतकरी, शहापूर