उल्हासनगरच्या प्रत्येक चौकाला एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. विविध पदार्थाची रेलचेल इथल्या चौकात पाहायला मिळते. तसाच एक चौक म्हणजे उल्हासनगर महापालिका मार्गावरील काशाराम चौक. इथे गेल्या पंधरा वर्षांपासून गुरू पुरीभाजी हे नाश्त्याचे ठिकाण आहे. पूर्वी कापड शिवणीचे काम करणाऱ्या किशोर शर्मा यांनी या दुकानाची सुरुवात केली. सध्या त्यांची तीन मुले हा व्यवसाय सांभाळतात. नाश्त्याच्या पदार्थासह इथे दुपारच्या जेवणाचीही चांगली पंगत बसते. शाकाहारीसह आठवडय़ातून तीन दिवस येथे मांसाहारही उपलब्ध असतो. शाकाहारीमध्ये राजमा, सोयाबीन, मकरी, मुंग मसाला, डालफ्राय, चनामसाला, छोले या सिंधी पद्धतीने बनविलेल्या भाज्या इथे मिळतात. मध्यम तिखट असूनही परिसरातील अनेक खवय्ये दुपारच्या जेवणासाठी गुरू पुरीभाजीला पसंती देतात. कोळशाच्या शेगडीवर गरम केलेल्या भाज्या इथे ताटात वाढल्या जातात. चपात्यांसोबतच तांदळाची भाकरी आणि त्यासह सिंधी नागरिकांमध्ये प्रसिद्ध असलेली गव्हाच्या पिठापासून मिरची कोंथिंबिरीच्या साहाय्याने तयार केलेली कोकीसुद्धा इथे उपलब्ध असते. बुधवार, शुक्रवार आणि रविवार येथे शाकाहारासोबत मांसाहारही असतो. मटण खिमा, चिकन खिमा, चिकन वडापाव असे चिकनपासून तयार केलेले अनेक पदार्थ येथे खवय्यांसाठी उपलब्ध असतात. मांसाहाराच्या दिवशी तर दुपारी इथे अक्षरश: जेवणासाठी रांग पाहायला मिळते. अनेकजण चिकन मसालासोबत तांदळाची भाकरी खाणे पसंत करतात तर कोकीसोबत चिकनची चव चाखणारेही तितकेच आहेत. खिमा राइसला इथे चांगली मागणी असते. झणझणीत खिमा आणि भाताची येथील चवच वेगळी असते. त्यामुळे अर्धा ते एक तास आपला नंबर येण्यासाठी लागत असला तरी खवय्ये चवीसाठी ताटकळत उभे राहणे पसंत करतात. अवघ्या ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत इथे भरपेट जेवण करता येते. त्यामुळे उल्हासनगरातील दूरवरून अनेकजण येथे दुपारच्या जेवणासाठी इथे येत असतात. मात्र जागेअभावी अनेकदा खवय्ये येथून पार्सल घेऊन जाणे पसंत करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा