कासा पोलिसांकडून १० प्रकरणांमध्ये ५० लाखांचा गुटखा जप्त
नितीन बोंबाडे, लोकसत्ता
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोलनाक्यावर मुंबई वाहिनीवरून खाजगी वाहनातून ३,५८, ५०६ किंमतीचा अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कासा पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. गेल्या २० दिवसांत १० प्रकरणांमध्ये पोलिसांनी ५० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी असली तरी सीमा भागांतून मोठय़ा प्रमाणात गुटख्याची आवक सुरू असल्याचे दिसून आले आहे.
कासा पोलीसांनी बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता धडक कारवाई करून एका खासगी वाहनाला ताब्यात घेतला. यामध्ये गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असल्याने नासीम अमीष मोमीन (३० वर्ष), आवेश अल्लाउद्दिन मोमीन (३८ वर्ष) यांना अटक केली. गुजरातमधील वापी येथून अवैध गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाल्याने कासा पोलीस ठाणेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्यात गुटखाविक्रीला बंदी असली तरी गुटख्याची लाखो रुपयांची उलाढाल होत असून अन्न व औषध प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हा गुटखा कुठून येतो, आयात कशी होते याकडे संबंधित प्रशासनाची करडी नजर ठेवावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
सर्रास विक्री
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर तालुके महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुके आहेत. तलासरीपासून काही अंतरावर असणाऱ्या नगर हवेली आणि गुजरात या राज्यांच्या सीमा आहेत. या सीमाभागात अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम राबवून कार्य कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. किराणा दुकाने, पानाच्या टपऱ्या आदी ठिकाणी सध्या सर्रास गुटख्याची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. डहाणू, तलासरी शहरांतील बाजारपेठांमध्ये शासनाचा नियम धाब्यावर बसवून गुटख्याची विक्री केली जात आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर राज्याच्या सीमेवर तपासणी चौकी आहे. तिथे वाहनांची तपासणी होते. मी पदभार स्विकारल्यापासून बेकायदा गुटखा वाहतुकीविरुद्ध १० कारवाया केल्या आहेत. त्यातून ५० लाखांहून जास्त गुटखा जप्त केला आहे. प्रवासी वाहने, अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली चालणारी वाहने या वाहनांमधून गुटख्याची वाहतूक केली जाते.सर्वच वाहने तपासणे शक्य नाही. तरी जी माहिती प्राप्त होते, त्यानुसार कारवाई करत आहोत.
– सिद्धवा जायभाये, सहाय्यक पोलीस अधिकारी, कासा पोलीस ठाणे</strong>