ठाणे: भिवंडी येथील कशेळी टोलनाक्याजवळ मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने ५ लाख ६३ हजार ८५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी साहील मणीयार (३३) आणि मोहम्मद शेख (४६) या दोघांना अटक केली आहे.
कशेळी येथील टोलनाक्याजवळ गुटखा आणला जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने नारपोली पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुपारी १२ वाजता सापळा रचून एक टेम्पो अडविला. त्यावेळी टेम्पोमध्ये ५ लाख ६३ हजार ८५० रुपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पोतील साहील आणि मोहम्मद या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.