ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ठाण्याच्या काही भागांत गारांचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वृक्ष कोसळले, घरांचे पत्रे उडून गेले. शहापूर, मुरबाडमध्ये शेतकरी आणि वीटभट्टी मालकांना पावसाचा फटका बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तविला जात होता. सोमवारी सायंकाळी अनेक भागात वादळी वाऱ्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर रात्री १० वाजता पावसाला सुरूवात झाली. ठाण्यातील कोपरी, कळवा आणि विटावा या भागांमध्ये गारांचा पाऊस झाला. अनेकांनी घराबाहेर पडून गारा वेचण्यासाठी गर्दी केली होती. ठाण्यातील इतर भागांतही विजांच्या कडाक्यासह पाऊस पडत होता. मंगळवारी पहाटेही शहरात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कल्याण -डोंबिवली भागातही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडला. कल्याणमधील खडेगोळवली, मल्हारनगर भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. मल्हारनगरमध्ये नारळाचे झाड एका घरावर पडले. डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ लोखंडी बांधणीची जाहिरातीची कमान निखळून पडली.

वाऱ्यामुळे काही चाळींवरचे पत्रे उडाले. भिवंडीमध्ये शहर आणि ग्रामीण भागांत पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर भागांत काही ठिकाणी पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या शहापूर, मुरबाड भागात अनेक शेतकरी पालेभाज्या आणि फळांचे उत्पन्न घेतात. अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे. उन्हाळय़ात या भागात वीटभट्टय़ांचा व्यवसाय केला जातो. पावसामुळे त्यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी ११ नंतर पाऊस गायब झाला, मात्र वातावरण ढगाळ होते. दरम्यान, ठाण्यात गारा पडल्याचा कोणताही अहवाल नाही. तसेच, कोकण भागातही असा कोणताही अहवाल नाही. नाशिक, धुळे, मध्य महाराष्ट्र या भागांत गारा पडल्या. मात्र पूर्व आणि पश्चिमी वारे यांच्यामधील अस्थिरता वाढल्याने आणि धुळीचे वारे वाहत असल्याने काही भागांत गारा पडू शकतात, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hail rain in thane rain with lightning in some areas ysh