दागिन्यांच्या किमतीत २० टक्के वाढ; काळ्या कपडय़ांना मागणी वाढली
भाग्यश्री प्रधान-आशीष धनगर
ठाणे : हलवा तयार करणाऱ्या कारागिरांची मजुरी वाढल्यामुळे यंदा हलव्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दागिन्यांची किंमत २० टक्क्यांनी वाढली आहे. संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर काळ्या कपडय़ांनाही मोठी मागणी आहे.
मकरसंक्रांतीला नवविवाहिता आणि बालकांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर वर्षी संक्रातीच्या काळात काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याच्या दागिन्यांना मागणी असते. यंदा हलव्याचे दागिने बनिविणाऱ्या मजुरांनी त्यांची मजुरी वाढविली आहे. त्यामुळे हे दागिने महाग झाले आहेत. लहान मुलांसाठी बाळकृष्णाचे दागिने तसेच नववधूसाठी मेखला, कंबरपट्टा, मंगळसूत्र, बांगडय़ा, नथ यासांरखे हलव्याचे दागिने बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या दागिन्यांची किंमत २०० ते २५० रुपयांच्या घरात आहे, तर नववधूसाठी लागणारे दागिने ३०० ते ७०० रुपयांना विकले जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या किमती तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, अशी माहिती नौपाडा येथील विक्रेते रूपेश कांबळी यांनी दिली.
संक्रांत जवळ येऊ लागल्यामुळे अनेक दुकानांत काळे पोशाख दर्शनी भागात झळकत आहेत. बाजूने कट्स असणारे गाऊन, जॉर्जेट आणि शिफॉनच्या साध्या किंवा नक्षीदार साडय़ा, काळ्या रंगाच्या चौकटी असणारे कुडते बाजारात उपलब्ध आहेत. बुट्टय़ांचे आणि अन्य नक्षीकाम असलेल्या साडय़ांची मागणी वाढली आहे. काळ्या रंगाचे बनारसी दुपट्टेही आहेत. बनारसी दुपट्टे शिवून किंवा तयार या दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत.
पारंपरिक वेशभूषेला पर्याय म्हणून टी-शर्ट ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारच्या कपडय़ांची किंमत ही साधारण ५०० पासून पुढे आहे.
लहान मुलांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी काळ्या रंगाचे झबले-धोतर घेणाऱ्यांचे प्रमाण यंदा वाढले असल्याचे ‘प्रथमेश बाळाचे कपडे’ या दुकानाच्या गीता मोरे यांनी सांगितले. त्यांची किंमत ३०० ते ५०० रुपये आहे. यंदा संक्रांती निमित्त पुरुषवर्गाकडूनही काळ्या रंगाच्या शर्ट्सची मागणी वाढली आहे. काळ्या रंगाचे कुडतेही बाजारात आले आहेत. ते ५००-७०० रुपयांत उपलब्ध आहेत.
टीव्ही मालिकांचा प्रभाव
रेशमी धाग्यापासून तयार केलेल्या दागिन्यांना संक्रांतीत अनेकांकडून पसंती मिळत आहे. ‘तुला पाहाते रे’ या मालिकेतील अभिनेत्रीने परिधान केलेल्या फुलांच्या दागिन्यांना यंदा संक्रांतीत सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ‘फुलपाखरू’ या मालिकेतील अभिनेत्री परिधान करत असलेल्या चौकटींच्या कुडत्यांनाही मागणी वाढत आहे.